लंडन - जगातील पहिल्या संपूर्णपणे विद्युतशक्तीवर चालणार्या विमानाने आकाशात यशस्वी झेप घेतली असून, हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे हवाई प्रवासाचे दर एक तृतीयांशपर्यंत खाली येतील, असे हे विमान तयार करणार्या एअरबस कंपनीने म्हटले आहे. या विमानाचे नाव इ फॅन असून, प्रायोगिक तत्वावरील या छोट्या विमानाची चाचणी फ्रान्सच्या नैरुत्येकडील (दक्षिण पश्चिम) बोरोडॉक्स विमानतळावर घेण्यात आली. इ फॅनची लांबी १९ आसनाइतकीच असून, त्याचा आवाज अगदी कमी आहे, हेअरड्रायरच्या आवाजापेक्षा तो थोडाच अधिक आहे असे कंपनीने म्हटले आहे. या विमानाला १२० लिथियम आयन पॉलिमर बॅटर्या वापरण्यात आल्या असून, या विमानाच्या गेल्या महिन्यात केलेल्या पहिल्या चाचणीत ते दहा मिनिटाइतकाच वेळ आकाशात होते. पण विमान रिचार्ज करण्याआधी ते एकतास आकाशात राहू शकते.
हे विमान पर्यावरणासाठी सुरक्षित असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या विमानाचे इंजिन ३० किलोवॅटचे एक तास चालवण्यासाठी या विमानाचा खर्च फक्त १६ अमेरिकन डॉलर आहे. तर सध्याच्या जेट इंधनावर चालणार्या विमानांचा ताशी खर्च ५५५ अमेरिकन डॉलर आहे. पण व्यावसायिकरित्या विद्युत विमान किती यशस्वी ठरु शकते हा आज प्रश्न आहे. विमानाच्या बॅटरी पंखात असून, त्यावर ते ४५ ते ६० मिनिटे उडू शकते. रिचार्ज करण्यासाठी एक तासाचा अवधी लागतो. सध्याच्या बॅटरी कितपत सुरक्षित असा प्रश्न विचारण्यात येत असला तरीही एअरबसच्या मते त्या सुरक्षित असल्याची कंपनीला खात्री आहे. इ फॅनच्या बॅटर्या संपल्यास बॅकअप बॅटरी मागच्या बाजुला असून, त्यावर विमान १५ मिनिटे तरंगत राहू शकतो.