सेऊल : आण्विक शस्त्र निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकत बुधवारी उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केली. ही चाचणी सकाळी १० वाजता म्हणजेच आंतरराष्ट्रीय वेळेनुसार ३.३० वाजता घेण्यात आली. याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून दक्षिण कोरियाने तर हा भविष्यासाठीचा धोका असल्याचे म्हटले आहे. देशाने एका छोट्या आकाराच्या हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केली आहे. अमेरिका आणि अन्य शत्रूंपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी एक हत्यार देशासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे वृत्त स्थानिक टीव्हीने दिले.हायड्रोजन बॉम्बची ही चाचणी यशस्वी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या घोषणेनंतर प्योंगयांगमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दक्षिण कोरियाची प्रतिक्रियाउत्तर कोरियाची ही चाचणी म्हणजे आमच्या भविष्याला धोका निर्माण करणारे कृत्य आहे, असे राष्ट्रपती पार्क गेयून हे यांनी म्हटले आहे. हे तर संयुक्त राष्ट्रसुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांचे उल्लंघन असल्याचेही दक्षिण कोरियाने म्हटले आहे. उत्तर कोरियावर नवे आणि अधिक कडक निर्बंध टाकले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सुरक्षा परिषदेची बैठक संयुक्त राष्ट्राने या विषयावर सुरक्षा परिषदेची तात्काळ बैठक बोलाविली आहे. या चाचणीमुळे प्योंगयांग आणि शेजारी राष्ट्रातील संबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. उत्तर कोरियाच्या या चाचण्यांवर जगाचे लक्ष आहे. (वृत्तसंस्था)
उ.कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी
By admin | Published: January 07, 2016 12:02 AM