Sudan President Video: दक्षिण सुदान देशाचे राष्ट्रपदी साल्वा कीर यांचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये राष्ट्रपती साल्वा कीर एका कार्यक्रमात आपल्या पँटमध्येच लघवी करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ लीक केल्याप्रकरणी दक्षिण सुदानच्या सरकारी मीडियातील सहा कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. नॅशनल असोसिएशन ऑफ जर्नालिस्टने रॉयटर्सला ही माहिती दिली आहे.
हा व्हिडिओ डिसेंबरमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये 71 वर्षीय राष्ट्रपती साल्वा कीर एका कार्यक्रमात राष्ट्रगीतासाठी उभे होते, यावेळी अनावधानाने ते पँटमध्येच लघवी करतात. हा व्हिडिओ टेलिव्हिजनवर प्रसारित झाला नसला तरी सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाला आहे.
दक्षिण सुदान युनियन ऑफ जर्नालिस्टचे अध्यक्ष पॅट्रिक ओएट यांनी सांगितले की, सरकार संचालित दक्षिण सुदान ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना मंगळवारी आणि बुधवारी ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, साल्वा कीर हे 2011 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून दक्षिण सुदानचे अध्यक्ष आहेत. ते आजारी असल्याच्या अफवा सोशल मीडियावर अनेकदा पसरल्या जातात. पण, सरकारी अधिकाऱ्यांनी ते आजारी असल्याच्या अफवा वारंवार फेटाळल्या आहेत.