चीनमधून पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर येत आहे. उत्तर आणि पूर्व चीनमध्ये न्यूमोनियाच्या प्रादुर्भावामुळे मृतांच्या संख्येत अचानक मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. चीनमधील स्थानिक लोकांचा दावा आहे की, चीनमध्ये कोरोना व्हायरसचा प्रभाव अद्याप संपलेला नाही, त्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होत आहे.
गेल्या वर्षाच्या अखेरीस चिनी अधिकाऱ्यांनी श्वसनाच्या आजारांचा संदर्भ देत कोरोना संसर्गाच्या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं होतं. अलीकडील मीडिया रिपोर्ट्स आणि सोशल मीडियावरील मोठ्या संख्येने पोस्ट्स दर्शवतात की, चीनच्या रुग्णालयांमध्ये गोंधळ उडाला आहे आणि लोकांवर उपचार केले जात नाहीत. रुग्णालयात मोठी गर्दी असते. बरेच रुग्ण, मुलांच्या फुफ्फुसात गंभीर लक्षणं दिसत आहेत. कोरोनाच्या गंभीर संसर्गामध्येही अशीच लक्षणं दिसून आली.
स्मशानभूमीवर लांबच लांब रांगा
अमेरिकन वृत्तपत्र इवोच टाईम्सच्या मते, चीनच्या डालियान शहरातील स्मशानभूमीच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ग्वांगझूमध्ये आकस्मिक मृत्यूची संख्या वाढली आहे. शांघायमध्येही मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होत आहे. लोक सोशल मीडियावर त्यांच्या कुटुंबाच्या किंवा शेजाऱ्याच्या मृत्यूबद्दल लिहित आहेत.
हेबेई प्रांतातील ग्रामीण भागातही लोक मोठ्या प्रमाणात मृत्यूची माहिती देत आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतेकांचं वय 50 वर्षांच्या आसपास होतं. गुआंग्शी प्रांतातील एका ग्रामस्थाने सांगितलं की, लसीकरण केलेल्या अनेक लोकांचा मृत्यू झाला अनेकांना अर्धांगवायूची समस्या भेडसावत आहे. इवोच टाईम्सच्या वृत्तानुसार, गुआंग्शी येथील एका तरुणाला, ज्याने वयाची 30 ओलांडली आहे, त्याला आता काठी घेऊन चालावं लागतं.