२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी हाफिझ सईद याचा निकटवर्तीय अबू कताल याची शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. या हल्ल्यामध्ये अबू कतालसह त्याचा एक सुरक्षारक्षक मारला गेला. तर एक सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला. दरम्यान, पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवाद्यांच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये असलेल्या अबू कताल याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला कसा केला, याची थरारक माहिती समोर आली आहे.
शनिवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमधील दीना पंजाब युनिव्हर्सिटीजवळ ही घटना घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी अबू कताल याचा ताफा जीनत हॉटेलजवळून जात होता. त्याच्याभोवती साध्या गणवेशातील पाकिस्तानी लष्करातील सैनिक आणि दहशतवाद्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचं कडं होतं. त्याचवेळी अज्ञात हल्लेखोरांनी धडाधड गोळीबार केला. त्याच अबू कताल हा जागीच ठार झाला.
अबू कताल याचं खरं नाव जिया उर रहमान उर्फ नदीम उर्फ अबू कताल उर्फ कताल सिंधी आणि अब्दुल वाहिद असं होतं. तो एनआयएच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक होता. तसेच २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिझ सईद याचा तो निकटवर्तीय होता.