ब्रिटनच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर ऋषी सुनक यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांनी अनेक मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला, तर काहींना एंट्रीही दिली आहे. यात लिझ सरकारमध्ये होम सेक्रेटरी असलेल्या सुएला ब्रेव्हरमन यांचाही समावेश आहे. त्यांची पुन्हा एकदा ब्रिटनच्या गृहमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. "भारतासोबत मुक्त व्यापारासंदर्भात करार केल्यास, ब्रिटेनमध्ये प्रवाशांची संख्या वाढेल. एवढेच नाही, तर व्हिसाची काल मर्यादा संपल्यानंतरही ब्रिटनचे प्रवासी परत जाणार नाहीत. भारतीयांसाठी अशा प्रकारे सीमा खुली केली जाऊ नये," असे ब्रेव्हरमन यांनी एका मुलाखतीत म्हटले होते.
ब्रिटनमध्ये अनेक महत्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. डोमिनिक राब यांना सुनक यांचे डेप्युटी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच जेरेमी हंट हे अर्थमंत्रीपदावर कायम राहतील. तसेच ज्या मंत्र्यांना आपले पद सोडायला सांगण्यात आले आहे, त्यांत भारतीय वंशाच्या आलोक शर्मा यांचाही समावेश आहे. ते ट्रस सरकारमध्ये मंत्री होते.
याशिवाय बिझनेस सेक्रेटरी जेकब रीस मोग, न्याय मंत्री ब्रँडन लुईस आणि क्लो स्मिथ यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सुनक सरकारमध्ये बेन वॉलेस यांना पुन्हा संरक्षण राज्यमंत्री करण्यात आले आहे. त्याच वेळी, जेम्स क्लेव्हरली पुन्हा परराष्ट्र सचिव असणार आहेत.
...म्हणून सुएला यांना दाखवण्यात आला होता मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता -सुएला ब्रेव्हरमन यांच्यावर एका खासदाराला ईमेलद्वारे सरकारी कागदपत्रे पाठविल्याचा आणि गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. यानंतर ब्रेव्हरमन यांनी याची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, ट्रस सरकार यानंतर लवकरच कोसळले. लिझ ट्रस यांनी आपले अपयश स्वीकारत पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.