हाँगकाँग म्हटलं की डोळ्यांसमोर येतात छोट्याशा बेटावरल्या उंचच उंच गगनचुंबी झगमगत्या इमारती! मात्र या श्रीमंत हाँगकाँगच्या पोटात माणसांना गुदमरत जगण्यास भाग पाडणारे कोंडवाडेदेखील आहेत.
हे कोंडवाडे बघायचे असतील तर हाँगकाँगमधील क्वून टाँगमध्ये जायला हवं. हाँगकाँगमधील सर्वात दाट लोकवस्ती असलेला, अति गरीब लोकांचा विभाग म्हणून क्वून टाँगची ख्याती आहे. कष्टकरी, कामकरी लोकं इथे गर्दी करून राहतात. ही माणसं किती दाटीवाटीनं राहतात हे समजून घेण्यासाठी लिऊ, सिऊ मिंग, ब्रेन शेक या माणसांच्या घरात डोकावं लागेल. ही माणसं दोन लाख वीस हजार लोकांपैकी एक आहेत, जी ६० ते ७० चौरस फुटांच्या खोल्यांमध्ये राहतात. स्वयंपाकपाणी, खाणंपिणं, झोपणं, सकाळची आन्हिकं हे सगळं या एवढुशा जागेतच!
उत्पन्नातल्या कमालीच्या विषमतेमुळे हाँगकाँगमधील लाखो लोकांना किमान सोयींपासून कोसो दूर असलेल्या जागेमध्ये स्वत:ला कोंडून घेत जगावं लागतं. पण आता ही जागाही आपल्यापासून हिरावली जाईल की काय, अशी भीती लोकांना वाटू लागली आहे. याचं कारण म्हणजे हाँगकाँग प्रशासनाने छोट्या घरांबाबत नवीन मानकं निश्चित करून त्यांची अंमलबजावणी करण्याचं जाहीर केलं आहे. त्यानुसार हाँगकाँगमधील अशी ३० हजार घरं पाडावी लागतील किंवा त्यांचं नूतनीकरण करावं लागेल. फ्लॅटधारक आर्थिक नफ्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी जागेत राहण्याची सोय म्हणून एकाच घराला अनेक खोल्यांमध्ये विभागतात. या विभागलेल्या खोल्या लोकांना भाड्याने देतात.
लिऊ या आपल्या बारा वर्षांच्या मुलीसोबत अशाच भाड्याच्या वीतभर खोलीत राहतात. या खोलीत स्वयंपाकघर आणि शौचालय एकत्रच आहे. स्वयंपाकाची भांडीकुंडी त्यांना शौचालयाच्या वर टांगावी लागतात. खोलीत भाज्या धुवायला, भांडी धुवायला साधं सिंकही नाही. ८० चौरस फुटाच्या त्यांच्या खोलीत त्यांना झोपायला जागा आहे ती केवळ २० चौरस फुटांची. घरातलं खाजगीपण थोडं तरी जपलं जावं यासाठी त्यांनी खिडकीला कागद लावलाय. बाहेरचे उंदीर खोलीत येऊ नयेत म्हणून त्यांना खिडकीदेखील बंद ठेवावी लागते. जागेअभावी घरातलं बरंचसं सामान खोलीबाहेरच ठेवावं लागतं.
स्वयंपाकघर आणि शौचालय एकत्र अशी रचना येथील बहुतांश घरात पाहायला मिळते. काही खोल्यांमध्ये तर केवळ स्वयंपाकघर किंवा केवळ शौचालय असतं. दोन ते तीन कुटुंबं मिळून त्याचा वापर करतात. अशा वीतभर खोलीचं भाडं आहे ५०० अमेरिकन डाॅलर्स. बांधकाम साइटवर काम करणाऱ्या लिऊ यांच्या पगारातला पाव भाग भाडं भरण्यातच जातो. मुलीच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या लिऊ यांना यापेक्षा लहान असली तरी थोडी स्वस्त जागा मिळाली तरी चालणार आहे.
जगभरात हाँगकाँग शहरात घराच्या किमती, घराची भाडी सर्वात जास्त आहेत. म्हणूनच की काय इवल्याशा जागांमध्ये राहणाऱ्या इथल्या गरीब माणसांनी आपल्या अपेक्षाही कमी ठेवल्या आहेत. आता लवकरच या घरांवर कुऱ्हाड कोसळणार आहे. छोटी घरं हा हाँगकाँगमधील लोकांच्या नाराजीचा विषय झाला आहे. २०१९ पासून हाँगकाँगमधील छोट्या घरांमुळे लोकांमध्ये सरकार विरुद्ध अस्वस्थता, नाराजी निर्माण होत आहे. म्हणूनच बीजिंगने २०४९ पर्यंत हाँगकाँग प्रशासनाला विभाजित घरं हटवण्याचा आग्रह केला आहे. त्यानुसार हाँगकाँगचे नेते आणि शहराचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी छोट्या घरांबाबत नियम आणि मानके तयार केली आहेत. त्यानुसार प्रत्येक घराला स्वतंत्र स्वयंपाकघर आणि न्हाणीघर असावं, प्रत्येक खोली किमान ८६ चौरस फुटाची असावी आणि प्रत्येक खोलीला खिडक्या असाव्यात, असा नियम करण्यात येणार आहे. या नियमात आता अस्तित्वात असलेली निम्मी घरं बसत नाहीत, असं तज्ज्ञ सांगतात. लाखो माणसांना महागड्या हाँगकाँगमध्ये ६०-६५ चौरस फुटांचीच घरं परवडत होती. आता या नवीन धोरण आणि मानकानुसार ही घरं जर पाडली गेली, तर डोक्यावर परवडणारं छप्पर कुठे मिळेल, हा प्रश्न तूर्तास तरी अनुत्तरित आहे.
हा ‘पिंजरा’ गेला, तर राहणार कुठे?हाँगकाँग प्रशासनाच्या नवीन धोरणानुसार लोकांचे प्रश्न सुटणार नसून वाढणारच आहेत, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. भाड्याने घर घेणंही लोकांना परवडणार नाही. विभाजित घरं पाडून, या घरातील माणसांना बाहेर काढून त्यांची काय सोय करण्यात येणार आहे, त्यांना सार्वजनिक गृहसंकुलात जागा दिली जाणार का? याबाबत काहीच स्पष्ट धोरण नसून शवपेट्या आणि पिंजऱ्याप्रमाणे असणाऱ्या ६०-६५ चौरस फुटांच्या छोट्या, अति नित्कृष्ट खोल्यांचा तर प्रशासनाने विचारही केलेला नसल्याने लोक हवालदिल आहेत.