नवी दिल्ली : बलुचिस्तानमध्ये एका दर्ग्यात आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला आहे. या आत्मघाती बॉम्बस्फोटात 18 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलुचिस्तानमधील फतेहपूर जिल्ह्यात असलेल्या झल मगसी दर्ग्यात हा आत्मघाती बॉम्बस्फोट करण्यात आला. या बॉम्बस्फोटात 18 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहे. बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते अन्वर हक काकर यांनी या आत्मघाती हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
ज्यावेळी दर्ग्यात आत्मघाती बॉम्बस्फोट घडविण्यात आला. त्यावेळी दर्ग्यामध्ये जवळपास 100 हून अधिक लोक उपस्थित होते. जखमी झालेल्या व्यक्तींमध्ये दोन पोलिसांचा समावेश आहे. तसेच, जखमी झालेल्यांना येथील जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याचबरोबर, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सरु आहे.
2017 मध्ये पाकिस्तानमधील दर्ग्यात दुस-यांदा असा हल्ला करण्यात आला आहे. याआधी गेल्या फेब्रुवारी महिन्यात सिंध प्रांतातील सेहवानमध्ये लाल सेहबाज कलंदर दर्ग्यात बॉम्बस्फोट करण्यात आला होता. यामध्ये 80 जणांचा मृत्यू झाला होता, तर 250 हून अधिक जण जखमी झाले होते.