लाहोर : पाकिस्तानच्या लाहोरमध्ये देशातील सर्वांत मोठ्या ख्रिश्चन वस्तीत चर्चमध्ये प्रार्थनेवेळी तालिबानी दहशतवाद्यांच्या आत्मघाती हल्ल्यात कमीतकमी १५ जण मारले गेले व ८०हून अधिक जखमी झाले. मृतांत दोन पोलिसांचा समावेश आहे. स्फोटानंतर दोन संशयित दहशतवाद्यांना जमावाने जिवंत जाळले.हल्लेखोरांनी रविवारच्या प्रार्थनेवेळी योहानाबाद भागातील दोन चर्चच्या प्रवेशद्वारांवर स्फोट घडवून आणले. यानंतर येथे चेंगराचेंगरी झाली आणि भयग्रस्त नागरिक जीव वाचविण्यासाठी पळू लागले. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या भ्याड हल्ल्यांचा निषेध केला आहे. लाहोरच्या सामान्य रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, योहानाबाद भागात स्फोटांत १५ नागरिक मृत्युमुखी पडले. मृतांत दोन पोलिसांचा समावेश आहे. ८० जण जखमी असून, अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. स्थानिक ख्रिश्चन नेते असलम परवेज सहोत्रा म्हणाले, ‘योहानाबाद वस्तीत ख्राईस्ट चर्च आणि कॅथलिक चर्च येथे रविवारची प्रार्थना सुरू होती. प्रार्थनेवेळी दोन आत्मघाती हल्लेखोरांनी चर्चेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी चर्चमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले. तेव्हा या हल्लेखोरांनी तेथेच स्फोट घडवून आणला.’ पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शहाबाज शरीफ यांनी या हल्ल्यांतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत देण्याची घोषणा केली आहे.
लाहोरच्या चर्चमध्ये आत्मघाती स्फोट
By admin | Published: March 16, 2015 3:46 AM