बीजिंग : चीनच्या शिंजियांग प्रांतातील एका पोलीस ठाण्यात स्फोटके लादलेले वाहन घुसवून आत्मघाती हल्ला करणा:या 13 जणांना पोलिसांनी शनिवारी गोळ्या घातल्या. स्फोटात 3 पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत.
गुंडांनी आज कारगिलीक काउंटीतील सार्वजनिक सुरक्षा इमारतीत वाहन घुसवून स्फोट घडवून आणला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई करीत 13 गुंडांना गोळ्या घातल्या, असे वृत्त तियानशान या सरकारी वेब पोर्टलने दिले आहे.
पोलिसांनी 13 हल्लेखोरांना ठार मारले, तर तीन पोलीसही जखमी झाले, असे शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. शिन्हुआच्या वृत्तानुसार, सकाळी करण्यात आलेल्या या हल्ल्यासाठी ट्रकचा वापर करण्यात आला. सार्वजनिक सुरक्षा विभागाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. शिंजियांग प्रांतात गेल्या अनेक वर्षापासून हिंसाचार सुरू आहे. चीन प्रशासनाने इतर प्रांतातील हान नागरिकांना येथे वसविल्याने उईघुर मुस्लिमांत असंतोष खदखदत आहे. या प्रांतात व आसपास सातत्याने होणा:या दहशतवादी हल्ल्यांना इस्ट तुर्कस्थान इस्लामिक मूव्हमेंट व अल-काईदाशी संबंधित गट कारणीभूत असल्याचा चीनचा आरोप आहे. चीनमध्ये अलीकडे अनेक बॉम्बस्फोट व चाकूहल्ले झाले आहेत. शिंजियांग प्रांताची राजधानी उरुमक्वी येथे मेमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा सर्वात भीषण होता. (वृत्तसंस्था)
यात दहशतवाद्यांनी स्फोटके लादलेली वाहने बाजारपेठेत घुसवून स्फोटांची मालिका घडवून आणली होती.
या स्फोटांकडे देशातील सर्वात भीषण हिंसाचार म्हणून पाहिले जात आहे. त्याचबरोबर शिंजियांगचा दहशतवाद अधिक गंभीर बनल्याचेही ते चिन्ह आहे. कारण, यापूर्वी हल्लेखोर चाकूहल्ले करीत होते. मात्र, आता ते स्फोटके आणि स्फोटके लादलेल्या वाहनांचा वापर करीत आहेत. उरुमक्वीखेरीज एप्रिलमध्ये एका रेल्वेस्थानकावर भीषण चाकूहल्ला झाला होता. यात तीन ठार तर 79 जण जखमी झाले होते. मार्चमध्ये कुनमिंग शहरातील रेल्वेस्थानकावर करण्यात आलेल्या चाकूहल्ल्यात 29 ठार, तर 143 जण जखमी झाले होते. सरकारी माध्यमांनी या हल्ल्याला चिनी 9/11 असे संबोधले होते. (वृत्तसंस्था)