काबूल : तालिबानच्या आत्मघाती हल्लेखोरांनी अफगाणिस्तानातील एका पोलीस मुख्यालयावर मंगळवारी हल्ला केला. यात २० जण ठार झाले. दहशतवादी पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेशात आले होते. लोगार प्रांताची राजधानी पुल-ई- आलम येथे हा हल्ला झाला. पहिल्या हल्लेखोराने मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर स्फोट घडवून आणला, दुसऱ्याने मुख्यालयाच्या आवारातील सुरक्षा चौकीजवळ स्वत:ला उडवून घेतले. त्यानंतर इतर हल्लेखोर पोलीस अधिकारी जेवण घेत असलेल्या भोजन कक्षाकडे धावले आणि त्यांनी तेथे स्फोट घडवून आणले. त्यामुळे मृतांची संख्या वाढली, असे प्रशासनाने सांगितले. लोगारचे पोलीस प्रमुख जनरल अब्दुल हकीम इसाकझाई यांनी सांगितले की, या बॉम्बहल्ल्यांत २० ठार, तर आठ जण जखमी झाले. मृतांत दोन नागरिकांचा समावेश आहे.हल्लेखोरांनी पोलीस गणवेश घातले असल्यामुळे त्यांना मुख्यालयात सहज प्रवेश मिळाला. तालिबानचा प्रवक्ता जबीउल्ला मुजाहिद याने एका वृत्तसंस्थेला पाठविलेल्या ई-मेलमध्ये या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.च्लाहोर : येथील पोलीस मुख्यालयाजवळील आत्मघाती स्फोटात २ कर्मचाऱ्यांसह ६ ठार झाले. पाक सरकारने आपल्या काही सदस्यांना फाशी दिल्याचा सूड उगविण्यासाठी तालिबानच्या एका गटाने हा हल्ला केला.
अफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला
By admin | Published: February 18, 2015 1:39 AM