अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात तालिबानचे रिफ्यूजी मंत्री खलील हक्कानी यांचा मृत्यू झाला आहे. गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा दिला आहे. घटनेचे कारण आणि जबाबदार व्यक्तीची ओळख अद्याप होऊ शकलेली नाही. तालिबानी सुरक्षा यंत्रणा प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
खलील हक्कानी अफगाणिस्तानातील रिफ्यूजी मिनिस्टी सांभाळत होते. ते शक्तिशाली हक्कानी नेटवर्कचे वरिष्ठ सदस्य आणि तालिबान सरकारचे गृह मंत्री तथा वरिष्ठ नेते सिराजुद्दीन हक्कानी यांचे काका होते. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, बुधवारी एका मशिदीत झालेल्या शक्तीशाली स्फोटात त्यांचा मृत्यू झाला आहे.
स्फोटातील मृतांची संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. तालिबान नेतृत्वाने हक्कानीच्या मृत्यूचीही पुष्टी अद्याप केलेली नाही. खलील हक्कानी 'हक्कानी नेटवर्क'ची स्थापना करणाऱ्या जलालुद्दीन हक्कानीचा भाऊ होता. हक्कानी नेटवर्क हे तालिबानच्या दोन दशकांच्या बंडादरम्यान काही सर्वात हिंसक हल्ल्यांसाठी जबाबदार होते.