काबूल : अफगाणिस्तानातील मेवोद एज्युकेशनल अकादमीवर बुधवारी सायंकाळी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 48 जण ठार झाले. तर 67 जण जखमी झाले. तेथील सार्वजनिक आरोग्या मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनुसार मृतांमध्ये मुलांचा सर्वाधिक समावेश आहे. स्फोटामध्ये वर्गखोलीचे छत कोसळल्याने मृतांची संख्या वाढली.
मेवोद एज्युकेशनल अकादमी ही काबुल पीडी-18 के दश्त-ए-बार्ची भागात आहे. या हल्ल्यामागे तालिबानचा हात असल्याचे सांगितले जात असले तरीही तालिबानचा प्रवक्ता जवीउल्लाह मुजाहीद याने हे वृत्त फेटाळले आहे. तालिबानने दहशतवादी हल्ल्याचे वृत्त फेटाळले असले तरीही अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
एका वृत्तानुसार , या अकादमीतील विद्यार्थी विद्यापीठ प्रशेवपरिक्षांची तयारी करत होते. आत्मघाती हल्ल्यावेळी अकादमीमध्ये जवळपास 100 मुले होती. यामध्ये मुले व मुली या दोघांचाही समावेश होता. शहरातील शिया क्लर्कियल काऊंन्सिलचे सदस्य जावेद घवरी यांनी इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेवेंट (आयएसआयएल) या संघटनेने हा हल्ला केल्याचा आरोप केला. या संघटनेने मशीदी, शाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर यापूर्वीही हल्ला केला आहे. मागिल दोन वर्षांत शिया समुदायावर 13 हल्ले झालेले आहेत.