ऑनलाइन लोकमत
सेंट पीटर्सबर्ग, दि. ४ - रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथील मेट्रो स्थानकांमध्ये झालेले स्फोट हा आत्मघाती हल्ला असल्याचे समोर आले आहे. या स्फोटामागे आत्मघाती हल्लेखोराचा हात असल्याची माहिती रशियन तपास यंत्रणांनी दिली आहे. दोन मेट्रो स्थानकांमध्ये झालेल्या या हल्ल्यात १४ जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते.
रशियातील तपास यंत्रणांनी हे बॉम्ब एका आत्मघाती हल्लेखोराने ठेवल्याचे उघडकीस आणले आहे. या हल्लेखोराची ओळख पटवण्यात तपास यंत्रणांना यश आले असून, अकबरझोन झालिलोव्ह असे या २२ वर्षीय हल्लेखोराचे नाव असल्याचे समोर आले आहे. किर्गिस्तानमध्ये जन्मलेला हा हल्लेखोर रशियन नागरिक आहे. मात्र या स्फोटात त्याचा मृत्यू झाला की नाही याबाबत सुरक्षा संत्रणांनी अधिकृत माहिती दिलेली नाही.
सोमवारी झालेल्या या स्फोटांची जबाबदारी अद्याप कुणीही स्वीकारलेली नाही. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे सेंट पीटर्सबर्ग येथे असतानाच हे स्फोट झाले होते. दरम्यान, या स्फोटातील मृतांची संख्या वाढून १४ झाली आहे. तसेच अद्याप ४९ जण रुग्णालयात उपचार घेत असल्याचे रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले.