अंकारा : तुर्कीच्या (Turkey) संसदेजवळ आत्मघाती हल्ला (Suicide Attack) करण्यात आला. तुर्कीची राजधानी अंकारा येथील संसदेजवळ एका आत्मघाती हल्लेखोराने रविवारी स्फोट केला, तर दुसरा हल्लेखोर पोलिसांशी झालेल्या गोळीबारात ठार झाला. या हल्ल्यात दोन पोलीस अधिकारी किंचित जखमी झाले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर संसदेचे कामकाज पुन्हा सुरू होण्याच्या काही तास आधी हा हल्ला झाला.
या हल्ल्याची माहिती देताना तुर्कीच्या गृह मंत्रालयाने सांगितले की, रविवारी अंकारा येथील तुर्की संसदेजवळ दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये दोन पोलीस अधिकारी जखमी झाले. दोन हल्लेखोर एका व्यावसायिक वाहनातून सकाळी 9.30 वाजता गृह मंत्रालयाच्या सुरक्षा महासंचालनालयाच्या गेटसमोर आले आणि त्यांनी आत्मघाती बॉम्ब हल्ला केला. यावेळी एका दहशतवाद्याने स्वत:ला बॉम्बने उडवले आणि दुसरा पोलिसांसोबत झालेल्या गोळीबारात ठार झाला.
तुर्की मीडियानुसार, ज्या ठिकाणी हा हल्ला झाला त्या ठिकाणी अनेक मंत्रालयांसह तुर्कीची संसद आहे. दरम्यान, आज राष्ट्रपती रेसेप तैयप एर्दोगन यांच्या अभिभाषणाने संसदेचे कामकाज सुरु होणार होते. टीव्ही चॅनल एनटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसराला पोलिसांना वेढा घातला असून परिसरात गोळीबाराचे आवाज ऐकू आले. या घटनेनंतर आपत्कालीन सेवाही घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच, हल्ल्यानंतर संसद भवन आणि गृह मंत्रालयाच्या इमारतीभोवती सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.