सना : येमेनची राजधानी सना येथे शुक्रवारी मशिदीला लक्ष्य करून तीन आत्मघाती हल्ले करण्यात आले. यात कमीत कमी १४२ जण ठार, तर शेकडो लोक जखमी झाले. या मशिदीत राजधानीवर नियंत्रण मिळविलेल्या शिया हुथी मिलिशियाचे लोक प्रार्थनेसाठी जमले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी सांगितले की, एक बॉम्बस्फोट सनाच्या दक्षिणेकडील बद्र मशिदीबाहेर झाला. दुसरा स्फोट लोक जीव वाचविण्यासाठी पळून जात असताना प्रवेशद्वारावर झाला. तिसऱ्या आत्मघाती हल्लात सनाच्या उत्तरेकडील हशाहुशा मशिदीला लक्ष्य करण्यात आले. हुथी मिलिशियाच्या अल मसिरा दूरचित्रवाणीने राजधानीतील रुग्णालयांद्वारे तातडीने रक्तदान करण्याचे आवाहन केल्याचे वृत्त दिले आहे. दरम्यान, या हल्ल्याची अद्याप कुणीही जबाबदारी स्वीकारली नाही. जानेवारीत सना येथील पोलीस अकादमीवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ४० जण मृत्युमुखी पडले होते. यानंतरचा सर्वांत मोठा हल्ला आहे. येमेनच्या सुरक्षा दलाने या हल्ल्यास अल काईदा जबाबदार असल्याचा दावा केला आहे. (वृत्तसंस्था)४हुथी समुदायाने गेल्या सप्टेंबरमध्ये राजधानी सनावर नियंत्रण मिळविले होते. ते आता सुन्नीबहुल आणि अल काईदाचे वर्चस्व असलेल्या प्रदेशावर ताबा मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ४तत्पूर्वी, २०१२ मध्ये दीर्घकाळ सत्तेवर असलेल्या अली अब्दुल्ला सालेह यांना पदच्युत करण्यात आल्यानंतर येमेनमध्ये अराजक माजले. सालेह हे हुथी समुदायाच्या पाठीशी होते. ४देशात प्रचंड राजकीय अस्थिरता असून जातीय तणावही शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर येमेनमधील कायदा आणि सुव्यवस्था आणखी अडचणीत आली आहे.
येमेनमध्ये आत्मघाती हल्ल्यात १४२ ठार
By admin | Published: March 20, 2015 11:56 PM