काबूल, दि. 13 - काबूल पुन्हा एकदा आत्मघाती बॉम्बस्फोटानं हादरलं आहे. अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमधील स्टेडियमजवळ दहशतवाद्यांनी आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. या दहशतवादी हल्ल्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे तर 40 जण जखमी झाले आहेत. स्टेडियममध्ये टी 20 सामना सुरु असताना हा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर सामना थांबवण्यात आला आहे.अफगाणिस्तानचा टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, काबूलमधील क्रिकेट स्टेडियमकडे जाणाऱ्या मार्गावरील चेकपोस्टवर दहशतवाद्याने हल्ला घडवून आणला. यामध्ये दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला आहे. सर्व खेळाडू सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.
काबूलमधील स्टेडियममध्ये स्थानिक संघामध्ये टी-20 चा सामना सुरु होता. त्यावेळी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर खेळाडूंना सुरक्षित स्थानवर हलवण्यात आले. टोलो न्यूजच्या वृत्तानुसार दहशतवादी स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असताना हा हल्ला झाला आहे.गेल्या दोन वर्षामध्ये आफगानिस्तानमध्ये क्रिकेटमध्ये खूप सुधारणा झालेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर संघ सध्या चांगली कामगिरी करतोय. या वर्षी सर्वाधिक बळी घेणाऱ्यामध्ये आफगानिस्तानचा राशिद खान प्रथम क्रमांकावर आहे. त्यानं आतापर्यंत या वर्षात 42 बळी घेतले आहेत.