ऑनलाइन लोकमतरियाध, दि. ४ - सौदीच्या पूर्वेकडील भागात असलेल्या कतिफमध्ये एका मशिदीजवळ आत्माघाती हल्ला करण्यात आला असून यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाल्याचे समजते.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, येथील पैगंबर यांच्या मशिदीजवळ पार्क करण्यात आलेल्या एका गाडीजवळ आत्मघाती हल्लेखोराने हा बॉम्बस्फोट घडवून आणला. हल्लेखोरानं हल्ला केलेला परिसर हा मुस्लिमबहुल भाग असून, याठिकाणी नमाज अदा करण्यासाठी अनेक लोकांनी गर्दी केली होती. या स्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. हा हल्ला येथील स्थानिक वेळेनुसार सातच्या सुमारास घडला. जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरू आहे.दरम्यान, आधीही मदिना आणि जेद्दाह शहरात हल्ले करण्यात आले आहेत. यात आत्मघाती हल्लेखोरासह दोन जण जखमी झाले आहेत. अद्याप या हल्ल्यांची कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारली नसल्याचे समजते.
गेल्या काही दिवसांपासून जगभरात दहशतवाद्यांचे हल्ले वाढत चालले आहेत. गेल्या आठवड्याभरात बॉम्बस्फोटाच्या घटना ताज्या असतानाच आता या बॉम्बस्फोटाची नवी घटना समोर आली आहे. गेल्याच आठवड्यात इस्तंबूल स्फोटानं हादरलं होतं. यात अनेकांचा मृत्यू झाला. तसेच दोन दिवसांपूर्वीच बांगलादेशची राजधानी ढाका येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.
(बगदादमध्ये दोन बॉम्बहल्ले ११९ ठार, १३० जखमी)
कालच बगदादमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 100हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. एकंदरीतच दहशतवाद ही जगभरात गंभीर समस्या बनत चालली आहे. त्यामुळे दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे.