जकार्ता:इंडोनेशियाचे माजी राष्ट्रपती सुकर्णो यांची मुलगी सुकमावती सुकर्णोपत्री(Sukmawati Sukarnoputri) यांनी इस्लाममधून हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. 26 ऑक्टोबर रोजी त्या पूजेमध्ये सामील होतील आणि हिंदू धर्म स्वीकारतील. सीएनएन इंडोनेशियाच्या रिपोर्टनुसार हा कार्यक्रम मंगळवारी सुकर्णो हेरिटेज एरियामध्ये होणार आहे. सुकमावती माजी राष्ट्रपती सुकर्णो यांची तिसरी मुलगी आहे. माजी राष्ट्रपती मेगावती या सुकर्णोपत्रीची धाकटी बहीण आहेत. 70 वर्षीय सुकमावती सुकर्णोपत्री या इंडोनेशियात राहतात.
यामुळे हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णयइंडोनेशियामध्ये इस्लामचे अनुयायी सर्वाधिक आहेत. एवढेच नाही तर इंडोनेशिया हा जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे. सुकमावतीचे वडील सुकर्णो यांच्या काळात भारत आणि इंडोनेशियाचे संबंध खूप चांगले होते. दरम्यान, सुकमावतीचे वकील विटेरियानो रेझोप्रोझो यांनी सांगितले की, सुकमावती यांचा हिंदू धर्म स्वीकारण्यामागचे कारण म्हणजे त्यांच्या आजीचा धर्म हिंदू आहे. तसेच, सुकमावतींनी हिंदू धर्माबद्दल खूप अभ्यास केला आहे. हिंदू धर्मशास्त्र नीट वाचले आहे, या सर्व गोष्टीनंतरच त्यांनी हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
अनेकदा हिंदू धर्मात येण्याची इच्छा व्यक्ती केलीसुकमावती यांनी अनेकदा हिंदू धार्मिक समारंभांना उपस्थित राहून हिंदू धार्मिक व्यक्तींशी संवाद साधला आहे. तसेच, अनेकदा हिंदू धर्मात येण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. आता 26 ऑक्टोबर रोजी 'शुद्ध वदनी' नावाचा कार्यक्रम बाली अगुंग सिंगराजा येथे आयोजित केला जाईल, ज्यात सुकमावती हिंदू धर्म स्वीकारतील. त्यांच्या नातेवाईकांनीही यासाठी सहमती दर्शवली आहे.
कट्टरपंथी मुस्लिमांकडून टीका2018 मध्ये कट्टरपंथी इस्लामिक गटांनी सुकमावतीविरोधात तक्रार दाखल केली होती. सुकमावती यांनी एक कविता शेअर केली होती, त्यात इस्लामचा अपमान केल्याचा आरोप कट्टरपंथीयांनी केला होता. त्या घटनेनंतर सुकमावतीने कवितेसाठी माफी मागण्याची मागणीही झाली होती. हा वाद अद्याप संपलेला दिसत नाहीये. त्यावरुन अनेकदा सुकमावती यांच्यावर टीकाही झाल्या आहेत.