भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स (Sunita Williams) आणि त्यांचे सहकारी अनेक महिन्यांपासून अंतराळात आहेत. मार्च अखेर किंवा एप्रिलच्या सुरुवातीला त्यांच्या परतीची अपेक्षा आहे. दरम्यान सुनिता विल्यम्स यांची तब्येत दिवसेंदिवस अशक्त होताना दिसत आहे. अशा परिस्थितीतही त्यांनी हार मानलेली नाही. अंतराळातच त्यांनी सहकाऱ्यांसोबत ख्रिसमस साजरा केल्याचं नव्या फोटोतून दिसत आहे.
नासाने ट्वीटरवर फोटो शेअर केला आहे. यामध्ये सुनिता विल्यम्सने लाल शर्ट आणि डोक्यावर सांताची टोपी घातली आहे. त्यांच्यासोबत एक सहकारीही आहे. नासाने लिहिले, "आणखी एक दिवस, आणखी एक संघर्ष.. नासाचे अंतराळवीर Don Pettit आणि सुनिता विल्यम्स अंतराळ स्टेशनच्या कोलंबस प्रयोगशाळा मॉड्युलमधून हॅम रेडिओवर बोलत ख्रिसमस सुट्टीासाठी फोटो पोज देत आहेत."
सुनिता विल्यम्सचा फोटो पाहून नेटकरी चिंतेत पडले आहेत. 'त्यांची तब्येत खूपच खराब झालेली दिसत आहे', 'त्यांना लवकरात लवकर परत आणण्याची गरज आहे.' त्यांच्या सुरक्षेसाठी नेटकरी प्रार्थना करत आहेत. नासाच्या वैज्ञानिकांनी मात्र चिंता करण्याची गरज नसल्याचं सांगितलं आहे. नासा सतत सुनिता यांच्या तब्येतीवर लक्ष देत असून काही दिवसांपूर्वीच त्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली आहे.