Sunita Williams Rescue Mission: भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या 5 जूनपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अडकून पडल्या आहेत. यामुळे दोघांनाही आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, या दोघांना संकटातून बाहेर काढण्यासाठी NASA ने विशेष मोहीम हाती घेतली आहे. गुरुवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता कझाकस्तानमधील लॉन्चपॅडवरुन NASA चे अन-क्रूड (क्रू सदस्य नसलेले) विमान सोडण्यात आले. हे विमान शनिवारी रात्री 8 वाजता (भारतीय वेळेनुसार) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचेल.
नासाने 3 टन अन्न, इंधन पाठवलेNASA ने रशियाच्या Roscosmos कार्गो स्पेसक्राफ्टद्वारे स्पेस स्टेशनवर अडकलेल्या सर्व क्रूसाठी 3 टन अन्न, इंधन आणि आवश्यक वस्तू पाठवल्या आहेत. मध्यंतरी सुनीता विल्यम्ससह सर्व अंतराळवीरांचे अन्न संपत असल्याचा दावा करण्यात आला होता. स्पेस स्टेशनवर बनवलेल्या फूड सिस्टम प्रयोगशाळेत ताज्या अन्नाचा पुरवठा कमी झाला होता, त्यानंतर नासाने तात्काळ हे 3 टन अन्न पाठवले आहे.
सुनीता विल्यम्स यांची तब्येत खालावली8 नोव्हेंबरला सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा एक फोटो समोर आला होता, ज्यामध्ये दोघांचेही वजन खूप कमी झाल्याचे दिसले होते. तेव्हापासून या दोघांच्याही तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. लोकांच्या चिंतेला उत्तर देताना, NASA च्या स्पेस ऑपरेशन्स मिशन डायरेक्टरेटचे प्रवक्ते जिमी रसेल म्हणाले की, 'स्पेस स्टेशनवरील सर्व NASA अंतराळवीरांची नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते, समर्पित फ्लाइट सर्जन त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवतात आणि सध्या सर्वजण चांगल्या स्थितीत आहेत.
अंतराळात दीर्घकाळ राहणे किती धोकादायक ?रिपोर्ट्सनुसार, जास्त वेळ अंतराळात राहणे शरीरासाठी हानिकारक आहे. यामुळे आपली हाडे कमकुवत होतात आणि वजनही कमी होते. इतकेच नाही, तर जास्त वेळ अंतराळात राहिल्याने लाल रक्तपेशी झपाट्याने नष्ट होऊ लागतात, याशिवाय ISS वर रेडिएशनचा धोका जास्त असतो आणि डोळ्यांच्या नसांवर दाब पडल्याने दृष्टीही खराब होऊ शकते. अशा परिस्थितीत अंतराळवीरांनी दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे, जेणेकरून हाडे आणि स्नायूंवर होणारा परिणाम कमी करता येतो.
सुनीता विल्यम्स कधी परतणार?सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे 8 दिवसांच्या मिशनवर स्पेस स्टेशनवर पोहोचले होते, मात्र बोइंगच्या स्टारलाइनर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांची मोहीम 8 महिन्यांची झाली. नासाने सुरक्षेच्या कारणास्तव स्टारलाइनरमधून दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्यास नकार दिला. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 5 जूनपासून ISS वर अडकले असून, त्यांना परत आणण्यासाठी इलॉन मस्क यांच्या कंपनीचे यान फेब्रुवारी 2025 मध्ये अवकाशात सोडले जाईल.