केप कॅनावेरल (अमेरिका) : संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर बुधवारी सुमारे ९ महिन्यांनंतर अंतराळातून स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूलमधून घरी परतले आहेत. त्यांना परतण्यास जवळपास १७ तास लागले.
स्टारलाइनरमध्ये २५ दिवसांत ५ वेळा हेलियम गळती झाली. अशा परिस्थितीत, अंतराळयानाच्या सुरक्षित परतीबद्दल चिंता होती. म्हणून नासाने ६ सप्टेंबर २०२४ रोजी अंतराळवीरांशिवाय स्टारलाइनर अंतराळयान पृथ्वीवर परत आणले. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर बोईंग आणि नासाच्या ८ दिवसांच्या संयुक्त ‘क्रू फ्लाइट टेस्ट मिशन’वर गेले होते. या मोहिमेचा उद्देश बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानाची अंतराळवीरांना अंतराळ स्थानकात नेण्याची आणि परत आणण्याची क्षमता तपासणे हा होता.
६ जून २०२४ : सुनीता व बुच यांचे स्टारलायनर कॅप्सूल आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल.सप्टेंबर : सुनीता व बुच यांच्या विना स्टारलायनर परत आणले गेले.१५ मार्च २०२५ : स्पेसएक्सने ४ अंतराळवीरांसह क्रू-१० ही रेस्क्यु मोहीम सुरू केली. १६ मार्च २०२५ : चार अंतराळवीर आयएसएसवर पोहोचले. त्यांनी सुनीता व बुच यांची भेट घेतली.१८ मार्च २०२५ : सुनीता आणि बुच यांचा परतीचा प्रवास सुरू झाला.
४६० कोटी रुपये प्रत्येकाच्या ‘सीट’साठीसुनीता ज्या स्पेसएक्समधून परतणार आहेत त्यासाठी प्रचंड खर्च करण्यात आला आहे. हा खर्च इतका आहे की यापेक्षा कमी पैशात भारताच्या इस्रोने स्वतःचे चांद्रयान तयार केले आहे आणि ते चंद्रावर उतरविले आहे. स्पेसएक्स क्रू ड्रॅगनमध्ये सहा अंतराळवीरांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. प्रत्येक सीटचे भाडे भारतीय चलनात ४६० कोटी रुपये आहे. स्पेसएक्सच्या क्रू-९ मिशनच्या चार जागांचे भाडे जवळपास १८४० कोटी रुपये आहे. यामध्ये संपूर्ण मोहिमेचा खर्च समाविष्ट नाही.
कसे परतले ड्रॅगन कॅप्सुल? - अंतराळ स्थानकातून निघालेले यान जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते, त्याला रिएन्ट्री म्हणतात. यान अंतराळात २८ हजार किमी प्रति तास प्रवास करते. मात्र, पृथीवर येताना त्याचा वेग कमी होतो. अंतराळवीरांना घेऊन येणारे ड्रॅगन कॅप्सुल रिएन्ट्रीनंतर जमिनीपासून काही किलोमीटर अंतरावर असताना त्याचे पॅराशूट उघडले गेले. यामुळे कॅप्सुल स्थिर राहण्यास मदत होते. पॅराशूट उघडले गेल्यानंतर कॅप्सुल नियोजित वेगाने पहाटे फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरील पाण्यात उतरले.
हाताने पेन्सील उचलणेही कठीण, हाडांचे नुकसानअंतरराळात अंतराळवीरांच्या शरीरावर मोठा परिणाम होतो. गुरुत्वाकर्षण नसल्याने संतुलन राखणारी यंत्रणा कमकुवत होते. अंतराळवीर जेव्हा अंतराळातून परततात तेव्हा त्यांचे शरीर पुन्हा गुरुत्वाकर्षण अनुभवण्याचा प्रयत्न करते. यामुळे त्यांना चक्कर येणे, अशक्तपणा आणि स्पेस मोशन सिकनेस यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अंतराळवीर स्नायू आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी व्यायाम करत असले तरी स्नायू आणि हाडांचे नुकसान होते. सुनीता यांना पुढील काही महिने हाताने पेन्सिल उचलणेही कठीण होईल.
पत्रात पंतप्रधान मोदींनी काय लिहिले? तुम्ही हजारो मैल दूर असला तरी...पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पत्रात लिहिले होते की, ‘तुम्ही हजारो मैल दूर असला तरी, तुम्ही आमच्या हृदयाच्या जवळ आहात. भारतातील लोक तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आणि तुम्हाला तुमच्या मोहिमेत यश मिळावे यासाठी प्रार्थना करत आहेत. तुम्ही परतल्यानंतर आम्हाला भारतात भेटण्याची उत्सुकता आहे. भारताला त्यांच्या सर्वांत प्रतिभावान कन्यांपैकी एकीचे आतिथ्य करणे आनंददायी असेल.’