Sunita Williams Space X : अंतराळात अडकून पडलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासाठी आज दिवस खास ठरला. नासा आणि स्पेसएक्सचे क्रू-१० मिशन सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) आहे. क्रू-१० मोहिमेतील अंतराळवीर फाल्कन ९ रॉकेटद्वारे ड्रॅगन अंतराळयानातून ISS वर पोहोचले. यशस्वीरित्या डॉकिंग आणि हॅच उघडल्यानंतर, अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना भेटले. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
क्रू ड्रॅगन अंतराळयान स्थानिक वेळेनुसार सकाळी ९.४० वाजता फाल्कन-९ रॉकेटने ISS वर पोहोचले. क्रू-१० संघात अमेरिकेचे दोन अंतराळवीर अँन मॅकक्लेलन आणि निकोल आयर्स, जपानी अंतराळवीर तुकुया ओनिशी आणि रशियाचे किरिल पेस्कोव्ह यांचा समावेश आहे. डॉकिंगनंतर क्रू-१० सदस्य सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना भेटले. यादरम्यान, सुनीता आणि विल्मोर यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. ते त्यांच्या सहकारी अंतराळवीरांना पाहून जल्लोष करताना आणि मजा करताना दिसले. त्यांनी सर्वांना मिठी मारून आपला आनंद व्यक्त केला.
आता पुढे काय?
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पुढील काही दिवस नवीन अंतराळवीरांना स्टेशनबद्दल माहिती देणार आहेत. या आठवड्याच्या अखेरीस, सुनीता आणि विल्मोर हे स्पेसएक्स कॅप्सूलद्वारे पृथ्वीवर रवाना होतील अशी अपेक्षा आहे. नासाच्या मते, हवामान अनुकूल असल्यास, स्पेसएक्स कॅप्सूल बुधवारपूर्वी अंतराळ स्थानकापासून वेगळे होऊ शकेल आणि फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरेल.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोप केला होता की, बायडेन यांनी सुनीता आणि बुच विल्मोर यांना अंतराळात सोडले. यानंतर, मस्क यांची कंपनी स्पेसएक्सने या दिशेने काम सुरू केले. तांत्रिक कारणांमुळे उशीर झालयानंतर अखेर क्रू-१० चे प्रक्षेपण १५ मार्च रोजी करण्यात आले आणि आज ते अंतराळात पोहोचले.