ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 7 - सध्याच्या काळातील सर्वात वेगवान प्रवासाचे साधन म्हटल्यावर बुलेट ट्रेन किंवा विमान असे सध्या उपलब्ध असलेले पर्याय समोर येतात. पण संयुक्त अरब अमिरातीतील सध्या अशा वाहतूक प्रकल्पावर काम सुरू आहे जो पूर्णत्वास गेल्यावर वेगवान वाहतुकीच्या क्षेत्रात क्रांती होणार आहे. दुबईत सुरू असलेल्या हायपरलूप वन या द्रुतगती प्रवासी प्रणालीमुळे दुबई ते अबुधाबी हे
सव्वाशे किलोमीटर अंतर अवघ्या 12 मिनिटांत पार करता येणार आहे. या प्रकल्पाची 8 नोव्हेंबर रोजी घोषणा होणार आहे.
हायपरलूपशी संबंधित असलेल्या टीमने रविवारी यूट्यूबवर एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. .या प्रकल्पाच्या प्रसिद्धीसाठी प्रसारित करण्यात आलेल्या या व्हिडिओत हायपरलूपमधून दुबई ते अबुधाबी हा 125.24 किमीचा प्रवास अवघ्या 12 मिनिटांत पूर्ण होईल, असा दावा करण्यात आला आहे. तसेच दुबई ते रियाध 48 मिनिटांत, दुबई ते दोहा 23 मिनिटांत आणि दुबई ते मस्कत हे अंतर अवघ्या 27 मिनिटांत पार करता येईल. असे या व्हिडिओतून सांगण्यात आले आहे.
तसेच या प्रकल्पासाठी होत असलेले बांधकाम, त्याच्यासाठी टाकण्यात येत असलेल्या भल्या मोठ्या पाइपलाइन यांची माहितीही व्हिडिओतून देण्यात आली आहे.
द्रुतगती वाहतूक प्रणाली विकसित करणे हा हायपरलूप वन प्रकल्पाचा मानस आहे. ही वाहतूक प्रणाली विशिष्ट्य प्रकारच्या कॅप्सूलवर आधारित असून या कॅप्सूल पाण्याखालून जाणाऱ्या हवेच्या पोकळ्यांमधून प्रवास करतील. त्यांचा कमाल वेग ताशी 1200 किमीपर्यंत असेल. या प्रकल्पाची सखोल माहिती मंगळवारी देण्यात येणार आहे. आता एकदा का हा प्रकल्प पूर्ण झाला की शेकडो किलोमीटरचे अंतर काही मिनिटांत पार करता येणार आहे.
पाहा व्हिडिओ -