ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 30 - जम्मू काश्मीरमधील सुरू असलेली हिंसा आणि वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे काश्मीर खो-यात अशांतता पसरलेली असताना पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी काश्मिरी जनतेला भारताविरोधात आणखी भडकावण्याचं काम केले आहे.
काश्मिरी जनतेचे अधिकार मिळवण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षाला पाकिस्तान समर्थन देत राहणार, असे विधान करत त्यांनी काश्मीरचा मुद्दा भडकवण्याचा प्रयत्न केला आहे.
हाजी पीर सेक्टर परिसराच्या दौ-यावर असलेल्या बाजवा यांना भारतीय जवानांनाकडून कथित स्वरुपातील शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची माहिती देण्यात आली. सोबत कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याविरोधात दोन हात करण्यासाठी पाकिस्तानचे सैन्य तयारीत असल्याचेही यावेळी त्यांना सांगण्यात आले. याचदरम्यान, बाजवा यांनी काश्मिरींच्या संघर्षासाठी पाकिस्तान आपले समर्थन देत राहणार, असे विधान करत आगीत आणखी तेल ओतण्याचं काम केले आहे.
"स्वयंनिर्णयाचे अधिकार आणि मूलभूत मानवी हक्कांसाठी काश्मिरी जनतेच्या राजकीय संघर्षाला आम्ही समर्थन देत राहणार", असे सांगत पाकिस्तानी सैन्याशी बातचित करताना बाजवांनी काश्मीर खो-यात अशांतता आणखी वाढवण्याच प्रयत्न केला आहे.
यावेळी त्यांनी भारतावर काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवत असल्याचाही आरोप केला. भारत केवळ काश्मिरी जनतेच्या नाहीतर नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानच्या भागात राहणा-या लोकांविरोधात हल्ले करण्यात सहभागी आहे, असा कांगावादेखील यावेळी बाजवा यांनी केला.