शिकागो/वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणूक शर्यतीत आघाडीवर असलेले माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी प्रचारादरम्यान गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. हल्लेखोर त्यांचाच समर्थक होता. हल्ल्यात ट्रम्प यांच्या कानाला गोळी चाटून गेल्याने ते बालंबाल वाचले. ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याने महासत्ता अमेरिकेसह जगभरात खळबळ उडाली. हल्लेखोराला सुरक्षारक्षकांनी ठार केले. या गदारोळात दोन जण गंभीर जखमी झाले.
डोनाल्ड ट्रम्प यांची पेनसिल्व्हेनिया शहरात शनिवारी सायंकाळी सव्वासहा वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास) प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. ही प्रचारसभा सुरू असतानाच एका माथेफिरूने ट्रम्प यांच्यावर एका छतावरून गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली. गोळीबाराचा आवाज येताच सभेत गोंधळ निर्माण झाला. सुरक्षारक्षकांनी ट्रम्प यांना गराडा घालत त्यांच्याभोवती सुरक्षेचे कडे निर्माण केले. तिथून त्यांना पीट्सबर्ग येथील रुग्णालयात नेण्यात आले. प्रथमोपचारानंतर ट्रम्प यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.
घटनाक्रम...
७८ वर्षीय ट्रम्प शहरातील खचाखच भरलेल्या मैदानात निवडणूक सभेत बोलत असताना गोळीबार सुरू झाला.
व्हिडीओ फूटेजमध्ये ट्रम्प त्यांचे कान हाताने झाकताना आणि खाली वाकताना दिसले.
जमलेल्यांमध्ये प्रचंड गोधळ निर्माण झाला.
अंगरक्षकांनी ट्रम्प यांना वेढा घालून सुरक्षित स्थळी हलवले.
कार्यक्रमस्थळी मागच्या बाजूला असलेल्या लोकांनी ताबडतोब बाहेर पडण्यासाठी धाव घेतली.
हल्लेखोराला टिपले : ट्रम्प यांच्यावर हल्ला करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला सुरक्षारक्षकांनी ठार केले. थॉमस क्रूक्स असे त्याचे नाव असून त्याने एआर प्रकारातील रायफलने ४५० फुटांवरून ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला. सभेच्या ठिकाणापासून जवळच उंच स्थानावरून क्रूक्सने व्यासपीठावर अनेक गोळ्या झाडल्या, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यासाठी हल्लेखोर व्यासपीठानजीक कसा पोहोचू शकला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अमेरिकी सुरक्षायंत्रणांतील त्रुटी यातून अधोरेखित झाल्या आहेत.
बायडेन यांच्याकडून विचारपूस : अध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्याशी फोनवरुन संवाद साधत तब्येतीची विचारपूस केली, असे व्हाइट हाउसच्या अधिकाऱ्याने सांगितले.
ट्रम्प म्हणतात... : ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ या सोशल मीडिया अकाउंटवरील पोस्टमध्ये काय घडले याबद्दल तपशीलवार सांगितले. ‘आपल्या देशात असे कृत्य घडू शकते हे अविश्वसनीय आहे. मरण पावलेल्या हल्लेखोराबद्दल सध्या काहीही माहिती नाही. माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला गोळी चाटून गेली. मला लगेच कळले. काहीतरी गडबड आहे.’
अशा प्रकारच्या हिंसाचाराला अमेरिकेत स्थान नाही. हे घृणास्पद आहे. देशाला एकसंध ठेवण्याची गरज का आहे हे यावरून दिसून येते. त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही.
- जो बायडेन, अध्यक्ष, अमेरिका
माझे मित्र अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मी अत्यंत चिंतित आहे. मी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करतो. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. मी त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान