वॉशिंग्टन - केंद्राने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर गेल्या दोन महिन्यांहूनही अधिक काळापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. एकीकडे शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत, तर दुसऱ्या बाजूला सरकारही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थाही मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आली आहे. सुरुवातीपासूनच दिल्लीतील शेतकरीआंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. हॉलिवूडची गायक रिहाना हिनेही शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात एक ट्विट केलंय. त्यानंतर, आता अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरीस यांच्या पुतणीनेही या आंदोलनाचं समर्थन करत सरकारच्या कृत्यावर निशाणा साधला आहे, हा लोकशाहीवर हल्ला असल्याचं त्यांनी म्हटलंय.
दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा आवाज आता जगभर पसरत आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या उप-राष्ट्राध्यक्षपदी मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या कमला हॅरीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर, भारतात जल्लोषही साजरा करण्यात आला. विशेषत: तामिळनाडूत मिठाई वाजून, आदल्या वाजवून भारतीय कन्येच्या अभिमानास्पद कामगिरीचं कौतुक झालं. आता, याच कमला हॅरीस यांच्या पुतणीने दिल्लीतील शेतकरी आंदोनलाचे समर्थन करताना, येथील आंदोलकांवर होणारा अत्याचार हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर संकट असल्याचं म्हटलंय.
मीना हॅरीस यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला समर्थन दिले आहे. मीना हॅरीस असं त्यांच नाव असून त्या प्रख्यात लेखिका आहेत. भारतात इंटरनेट बंद केले असून आंदोलक शेतकऱ्यांविरुद्ध निमलष्करी दल तैनात केले आहे, याचा आपल्याला राग यायला हवा, असे मीना हॅरीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. महिनाभरापूर्वीच जगातील सर्वात जुन्या लोकशाहीवर हल्ला करण्यात होता, आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर आता हल्ला होत आहे, हा काही योगायोग नसून परस्पर संबंधित आहे, असेही मीना हॅरीस यांनी म्हटलंय.
गायिका रिहानानेही केलं ट्विट
याच शेतकऱ्यांचा आवाज आता प्रसिद्ध सिंगर आणि परफॉर्मर रिहानापर्यंतही पोहोचला आहे. रिहानाने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले. रिहानाने ट्विटरवर एक न्यूज शेअर केली आहे. यात शेतकरी आंदोलनामुळे बंद केलेल्या इंटरनेट सुविधेचाही उल्लेख आहे. यात, शेतकरी आंदोलनामुळे हरियाणातील अनेक जिल्ह्यांत कशा प्रकारे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली, हेही सांगितले आहे. रिहानाने या न्यूज बरोबर कॅप्शनमध्ये लिहिले आहे, यासंदर्भात आपण चर्चा का करत नाही आहोत? #FarmersProtest. रिहानाच्या ट्विटनंतर शेतकरी आंदोलनाची जगभर चर्चा होत असल्याचं दिसून येत आहे. मात्र, रिहानाच्या ट्विटनंतर आता तिच्या फॉलोवर्सचीच चर्चा रंगली आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटरवरील फॉलोवर्सच्या तुलनेत रिहाना एक पाऊल पुढेच आहे.
ग्रेटा थनबर्गनेही केले समर्थन -
रिहानानंतर आता स्विडिश पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग यांनीही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. आम्ही भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी एकजुटीने उभे आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.