पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची गुरूवारी सुटका करण्यात आली. ही अटक बेकायदेशीर असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं इम्रान खान यांची तात्काळ सुटका करण्याचे निर्देश दिले. यासोबतच उच्च न्यायालयाला शुक्रवारी पुन्हा सुनावणी घेण्याचे निर्देशही देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयानं इम्रान खान यांचा घरी जाण्याचा अर्ज फेटाळत त्यांना पोलीस लाईनमध्ये थांबण्यास सांगितलंय. एकीकडे इम्रान खान यांच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच दुसरीकडे पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्री मरियम औरंगजेब पत्रकार परिषदेत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना धमकी दिली.
गुरुवारी संध्याकाळी मरियम औरंगजेब यांनी माध्यमांशी संवाद साधला. “पाकिस्तान जळत आहे. जर उद्या न्यायाधीशांच्या घरात घुसुन कोणी आग लावली तर? तुम्ही निर्णय घ्या. कोणाचं घर वाचणार नाही. राजकारण्यांचं घर, राणा सनाउल्लाह (गृहमंत्री) यांचं घर जाळण्यात आलं, हे नोटीस का केलं नाही. ते इथले लोक नाहीत का? रुग्णवाहिका जळाल्या, शाळा जाण्यात आल्या, ते रेडियो पाकिस्तान तुमचं नाही का?” असा सवाल त्यांनी केला.
६० अब्ज रुपयांचा हिशोब द्यावा लागणार आहे. जे पैसे सर्वोच्च न्यायालयाच्या खात्यात आले आहेत. ज्याच्या भरवशावर इम्रान खान विश्वस्त झाले. देशाच्या तिजोरीतील ६० अब्ज रुपये त्यात आले आहेत. न्यायालयाचं वॉरंट घेऊन पोलीस गेलेले तेव्हा त्यांची डोकी फोडण्यात आली. तर त्यांना का शिक्षा दिली नाही. तुम्ही इम्रान खान यांना का शिक्षा दिली नही? तुम्ही शिक्षा ठोठावली असती तर आज आपला देश जळत नसता, असंही त्या म्हणाल्या.
मला लाठ्यांनी मारहाण केली - इम्रान खान
सुटका झाल्यानंतर इम्रान खान यांनी आपल्याला लाठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला. इम्रान खान सरन्यायाधीशांना म्हणाले की, मला अजूनही कळत नाही की माझ्यासोबत असे का झाले..? कोर्टरुममधून माझे अपहरण करण्यात आले. मी वॉरंट मागितलं, पण मला वॉरंट दाखवलं गेलं नाही. मला गुन्हेगारासारखं वागवलं गेलं. मला मारहाण झाली. आम्हाला निवडणुका हव्या आहेत, आम्ही गोंधळ का करू? त्यावर सरन्यायाधीशांनी राजकारणावर बोलू नका, असं त्यांना सांगितलं.