लाहोर : पाकिस्तानात पुन्हा एकदा विंग कमांडर अभिनंदनच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पाकिस्तानी संसदेत अभिनंदनच्या सुटकेच्या वेळची पाकिस्तानी लष्करप्रमुखांची अवस्था जगजाहीर केल्याने मोठी खळबळ उडाली होती. तर आज अचानक लाहोरच्या रस्त्यांवर अभिनंदन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पोस्टर झळकू लागल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
या पोस्टरमधून नवाझ शरीफ यांच्या पक्षाचे नेते अयाज सादिक यांच्यावर टीका करण्यात आली आहे. सादिक यांना समाजाचा गद्दार म्हणत त्यांची तुलना मीर जाफरसोबत करण्यात आली आहे. सादिक यांनीच अभिनंदन यांच्या सुटकेवरून इम्रान खान सरकारची पोलखोल केली होती.
भारतीय हवाई दलाचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका झाली नसती तर भारत पाकिस्तानवर हवाई हल्ले करण्याच्या तयारीत होता, असा गौप्यस्फोट पाकिस्तान मुस्लीम लिग (नवाझ) पक्षाचे खासदार अयाझ सादिक यांनी केला होता. यावरून पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे सादिक यांच्या मतदारसंघातच हे पोस्टर झळकले आहेत. यावर विंग कमांडर अभिनंदन आणि मोदी यांचे फोटो मुद्दामहून लावण्यात आले आहेत. यामध्ये सादिक यांना देशद्रोही ठरविण्यात आले आहे. तर काही पोस्टरमध्ये सादिक यांना अभिनंदनच्या रुपात दाखविण्यात आले आहे. काही पोस्टरमध्ये त्यांना भारताचे समर्थकही म्हटले गेले आहे.
पुलवामा हल्ला, भारताचा एअर स्ट्राईक अन् अभिनंदन यांची सुटकाफेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीरमधील बालकोटवर हवाई हल्ले केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानी हवाई दलाची विमानं भारतीय हद्दीत घुसली. त्यांना पिटाळून लावण्यासाठी भारतीय हवाई दलाची विमानं झेपावली. यावेळी भारताचं मिग विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळलं आणि विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या हाती लागले. त्यांची ४८ तासांत सुटका करण्यात भारताला यश आलं. अभिनंदन यांनी हवाई चकमकीत पाकिस्तानचं एफ-१६ हे अत्याधुनिक लढाऊ विमानं जमीनदोस्त केलं होतं.
एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानात काय घडलं?भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानमधील परिस्थिती काय होती, याची माहिती संसदेचे माजी अध्यक्ष अयाज सादिक यांनी दिली आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी अयाज सादिक यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. 'भारत हल्ला करेल या भीतीनं तेव्हा पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांचे पाय कापत होते. त्यांच्या चेहऱ्यावर घाम अगदी स्पष्ट दिसत होता. बाजवा यांना भारताच्या हल्ल्याची भीती वाटत होती,' असं सादिक संसदेत बोलताना दिसत आहेत. या बैठकीला परराष्ट्रमंत्री महमूद शाह कुरेशी उपस्थित होते, अशी माहितीही सादिक यांनी दिली. 'कुरेशी त्या बैठकीला उपस्थित असल्याचं मला आठवतं. त्या बैठकीला हजर राहण्यास पंतप्रधान इम्रान खान यांनी नकार दिला होता. कुरेशी यांचे पाय कापत होते. त्यांना घाम फुटला होता. अभिनंदन यांची सुटका करा. अन्यथा भारत हल्ला करेल, असं आम्ही कुरेशी यांनी म्हटलं होतं,' असं सादिक यांनी संसदेला सांगितलं.