Maladiv Mohamed Muizzu India Visit : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू आणि त्यांच्या पत्नी साजिदा मोहम्मद या भारत दौऱ्यावर आले आहेत. भारताच्या पहिल्या द्विपक्षीय दौऱ्यासाठी रविवारी दोघेही नवी दिल्लीत आले होते. सोमवारी त्यांनी नवी दिल्लीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारतासोबतच त्यांनी मालदीवमध्ये राहणाऱ्या भारतीयांचेही कौतुक केले. यावेळी मोहम्मद मुइज्जू यांनी भारताच्या सुरक्षेला कधीही धक्का पोहोचू देणार नाही, असे म्हटलं होतं. मात्र आता मालदीवच्या विरोधक आणि सोशल मीडिया युजर्सनी नवी दिल्लीत येऊन मोहम्मद मुइज्जू यांनी अचानक घेतलेल्या भूमिकाबद्दल त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. मुइज्जुंच्या भोळ्या आणि अनुभव नसलेल्या प्रशासनाला हे समजले आहे की मुत्सद्दीपणा लबाडी आणि फसवणुकीद्वारे केली जाऊ शकत नाही, असं विरोधकांनी म्हटलं आहे.
भारतासोबतचे संबंध बिघडवणे मालदीवच्या हिताचे नाही, असे भारत समर्थक असलेल्या मालदीवच्या विरोधी पक्षांनी वारंवार सांगितले आहे. तसेच मोहम्मद मुइज्जूंच्या इंडिया आऊट मोहिमेला वारंवार विरोध केला आहे. आता मालदीवमधील विरोधी पक्षाने मोहम्मद मुइज्जूंच्या यू-टर्नवरुन आश्चर्य व्यक्त केलं आहे. भारत दौऱ्यावर असलेल्या मोइज्जूंनी कबूल केले की भारताने मालदीवसाठी एक मजबूत मित्र असल्याचे सातत्याने सिद्ध केले आहे आणि द्विपक्षीय संबंधांवर विश्वास व्यक्त केला.
चीन समर्थक मानल्या जाणाऱ्या मुइज्जू यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मालदीवच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला आणि शपथ घेतल्यानंतर काही तासांतच त्यांनी भारतीय सैन्याला आपल्या देशातून काढून टाकण्याची मागणी केली. त्यानंतर भारतीय लष्करी जवानांची जागा तिथल्या नागरिकांनी घेतली. त्यानंतर भारत आणि मालदीवमधील संबंध ताणले गेले होते. मात्र आता गोष्टी सकारात्मक होऊ लागल्या आहेत. मोहम्मद मुइज्जू त्यांच्या पहिल्या द्विपक्षीय भेटीसाठी भारतात आले आहेत आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी भेटी घेतल्या आहेत.
जानेवारीमध्ये पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीप बेटांना भेट दिल्यानंतर मालदीवच्या दोन मंत्र्यांनी अपमानास्पद टिका केली होती. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडले होते. यामुळे भारतीय पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर बहिष्कार टाकला आणि लक्षद्वीपला पसंती दिली. त्यामुळे मालदीवमध्ये जाण्यात पहिल्या क्रमांकावर असलेले भारतीय पर्यटक सहाव्या क्रमांकावर आले.
मुइज्जुंच्या भारत भेटीवर विरोधी मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीचे अध्यक्ष अब्दुल्ला शाहिद यांनी भाष्य केलं. अब्दुल्ला शाहिद यांनी मालदीव आणि भारत यांच्यातील जुन्या संबंध पूर्वी सारखे होत असल्याचे पाहून आनंद व्यक्त केला आणि मालदीवच्या लोकांसोबत उभे राहिल्याबद्दल भारताचे आभार मानले. राष्ट्रपती इब्राहिम सोलिह यांच्या कार्यकाळात सुरू झालेले प्रकल्प आणि उपक्रम यशस्वी झाले आहेत आणि ते चालू ठेवले जात आहेत हे पाहून मला आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मालदीवच्या सोशल मिडिया युजर्सनी मुइज्जूंच्या भारतविरोधी विधानांचे स्क्रीनशॉट व्हायरल केले आहे. "हे आता स्पष्ट झाले आहे की,इंडिया आऊट हे मोहम्मद मुइज्जू यांनी आपल्या बाजूने मत वळण्यासाठी आणि इब्राहिम सोलेहच्या अध्यक्षपदाबद्दल खोटे पसरवण्यासाठी बोललेलं खोटं होते," असे आका युजरने म्हटलं आहे.