बितुनिया चौकी (वेस्ट बँक) : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज रविवारी पॅलेस्टाईनमध्ये दाखल झाल्या आहेत. पॅलेस्टाईनचे आशिया विभागाचे सहायक विदेशमंत्री माजेन शामियेह यांनी सुषमा स्वराज यांचे स्वागत केले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या या भागातील ऐतिहासिक दौऱ्यानंतर तीन महिन्यांनंतर सुषमा स्वराज येथे आल्या आहेत. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या रमल्ला येथे वेस्ट बँक शहरात पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास आणि विदेशमंत्री रियाद अल मलिकी यांच्याशी चर्चा करणार आहेत. भारत-पॅलेस्टाईन डिजिटल लर्निंग अँड इनोव्हेशन सेंटरच्या शुभारंभ कार्यक्रमाला त्या उपस्थित राहतील. भारत सरकारच्या पुढाकाराने ही योजना आकाराला येत आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा पश्चिम आशिया क्षेत्रातील हा पहिलाच दौरा आहे. पॅलेस्टाईनचा दौरा पूर्ण करून सुषमा स्वराज या दोन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर जाणार आहेत. इस्रायलमध्ये त्या राष्ट्रपती रेउविन रिबलिन, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा करणार आहेत. नेतन्याहू यांच्याकडे विदेश मंत्रालयाचा पदभार आहे. इस्रायलचे संरक्षणमंत्री मोशे यालो यांच्याशीही त्या चर्चा करतील. (वृत्तसंस्था)
सुषमा स्वराज चर्चेसाठी पॅलेस्टाईनमध्ये दाखल
By admin | Published: January 18, 2016 3:38 AM