ऑनलाइन लोकमत
अबूधाबी, दि. २७ - एका ट्विटच्या आधारे भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) मानवी तस्करांच्या जाळ्यात अडकलेल्या भारतीय मुलीची सुटका केली आहे.
कतारमध्ये काम करणा-या देव तांबोळी यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरद्वारे सुषमा स्वराज यांच्याशी संपर्क साधला होता. माझी बहिण यूएईत मानवी तस्करांच्या जाळ्यात अडकली असून तिची सुटका करावी अशी विनंती देव तांबोळी यांनी केली होती. या ट्विटची सुषमा स्वराज यांनी तातडीने दखल घेतली व यूएईतील भारतीय दुतावासाला याप्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले. भारतीय दुतावासाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने संबंधीत मुलीची सुटका केली आहे. सध्या या मुलीची भारतीय दुतावासातर्फे चालवणा-या जाणा-या सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तिला पुन्हा भारतात आणले जाईल असे सूत्रांनी सांगितले. संबंधीत तरुणी एअर होस्टेस बनण्यासाठी यूएईत दाखल झाली होती. मात्र त्यांना आधी घरकाम करण्यास भाग पाडण्यात आले. संबंधीत मुलीने यास नकार दिल्यावर तिला एका खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. या खोलीत आणखी १० मुलीदेखील होत्या अशी माहिती समोर आली आहे.