इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना इस्लामाबाद हायकोर्टाने दिलासा दिला आहे. नवाज शरीफ, त्यांची कन्या मरियम आणि जावई मोहम्मद यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. एवेनफील्ड प्रोपर्टीज प्रकरणात दोषी ठरल्यानंतर पाकिस्तानमधील सर्वसाधारण निवडणुकांपूर्वी नवाज शरीफ यांना तुरुंगात टाकण्यात आले होते.
इस्लामाबाद हायकोर्टाच्या खंडपीठातील न्यायाधीश अतहर मिनाल्लाह आणि न्या. हसन औरंगजेब यांनी आपल्या आदेशात नवाज शरीफ यांची शिक्षा रद्द करण्याचे बजावले आहे. एवेनफील्ड प्रोपर्टीज प्रकरणात न्यायालयाने 6 जुलै रोजी निर्णय देता शरीफ यांना दोषी ठरवले होते. शरीफ यांच्या कुटुबीयांचे लंडनमध्ये 4 लक्झरी फ्लॅट आहेत, असाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. पाकिस्तानमधील निवडणुकांपूर्वी शरीफ यांनी आपल्या मुलीसह पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्यानंतर, त्यांना रावळपिंडी येथील कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यावेळी, नवाज शरीफ यांना 10 वर्षांची, मरयम यांना 7 वर्षांची तर कॅप्टन सफदर यांना 1 वर्षांची सजा सुनावण्यात आली होती. मात्र, आज उच्च न्यायालयाने ही सजा रद्द केली आहे.