ठळक मुद्देमस्वाती यांनी वयाच्या 18 व्या वर्षी 1986 साली स्वाझीलँडचा राज्यकारभार हाती घेतला त्यांच्या अत्यंत ऐशोरामीच्या जीवनशैलीवर जगभरातून नेहमीच टीका होत असते. मस्वाती (तिसरे) यांचे वडिल शोभुजा (दुसरे) यांनी स्वाझीलँडचे राजेपद 82 वर्षे भूषविले होते.
स्वाझीलँड- आफ्रिकेतील हा लहानसा देश. स्वातंत्र्य मिळवून पन्नास वर्षे झाली, आफ्रिका खंडात या एकमेव देशात पूर्ण राजेशाही राजवट आजही आहे. आता स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी देशाचं नावच बदलायचं ठरवलं आहे. हा देश आहे स्वाझीलँड. या देशाचे राजे मस्वती (तिसरे) यांनी परदेशी पाहुण्यांची स्विर्त्झलँड आणि स्वाझीलँड या नावात गल्लत होऊ नये म्हणून आपण हा बदल करत असल्याचे जाहीर केले आहे.
स्वाझीलँडचं नाव आता इस्वातिनी असे करण्यात आले आहे. युरोपीय देशांकडून स्वातंत्र्य मिळवल्यावर आफ्रिकेतील देशांनी आपली मूळ नावे पुन्हा धारण केली होती मात्र स्वाझी लोकांचा प्रदेश म्हणून स्वाझीलँड असे ब्रिटिशांनी ठेवलेले नाव कायम राहिले होते. स्वातंत्र्यानंतर ऱ्होडेशियाचे झिम्बाब्वे, न्यासालँडचे मालावी आणि बेशुनालँडचे बोटस्वाना अशी नावे बदलण्यात आली होती.
आम्ही पुन्हा जुने मूळ नाव धारण केल्याची घोषणा करताना मला अत्यंत आनंद होत आहे असे राजे मस्वती यांनी सांगितले. स्वाझीलँडमधील स्वाझी आणि इंग्लिश अशी सरमिसळ काही नागरिकांना आवडत नव्हती. 2015 पासूनच हे नाव बदलण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. राजे मस्वाती यांनी याआधीच आपल्या भाषणांमध्ये हे नाव वापरण्यास सुरुवात केली होती. मस्वाती यांनी वयाच्या 18 व्या वर्षी 1986 साली स्वाझीलँडचा राज्यकारभार हाती घेतला त्यांच्या अत्यंत ऐशोरामीच्या जीवनशैलीवर जगभरातून नेहमीच टीका होत असते. मस्वाती (तिसरे) यांचे वडिल शोभुजा (दुसरे) यांनी स्वाझीलँडचे राजेपद 82 वर्षे भूषविले होते. शोभुजा (दुसरे) यांनी 125 विवाह केले होते असे त्यांचे चरित्रकारांनी लिहून ठेवले आहे तर मस्वाती यांचे 15 विवाह झाल्याचे सांगण्यात येते.
सध्या या देशाच्या राज्यघटनेत 200 वेळा देशाचे नाव स्वाझीलँड असे नमूद करण्यात आले आहे तसेच स्वाझीलँडच्या सरकारी विमानकंपनीचे नाव स्वाझीलँड एअरलिंक असे आहे, सर्व चलनावर म्हणजे नोटा-नाण्यांवरही स्वाझीलँड असेच नाव आहे आणि मध्यवर्ती बँकेचे नावही सेंट्रल बँक ऑफ स्वाझीलँड असे आहे. या सर्व ठिकाणी स्वाझीलँडचे नाव बदलावे लागणार आहे. सर्व सरकारी संकेतस्थळांवरही नाव बदलण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे. मात्र संयुक्त राष्ट्रे आणि राष्ट्रकूलमध्येही इस्वातिनी असे नाव करण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे.