जगणं सुसह्य होण्यासाठी विविध गोष्टी केल्या जातात. पण आता मरण सुसह्य होणाऱ्या एका मशीनची निर्मिती करण्यात आली आहे. स्वित्झर्लंडने (Switzerland) इच्छामरण देण्याऱ्या मशीनला आता कायदेशीर मान्यता दिली आहे. यामुळे एक मिनिटात वेदनारहित आणि शांततापूर्ण मृत्यू होणार आहे. शवपेटी आकाराच्या या कॅप्सूनला स्वित्झर्लंडमध्ये कायदेशीर करण्यात आली असल्याची माहिती याच्या निर्मात्यांनी दिली आहे. या पेटीमध्ये एखाद्या व्यक्तीला ऑक्सिजन पातळी कमी करून हायपोक्सिया आणि हायपोकॅप्निया द्वारे मृत्यू दिला जातो.
एका रिपोर्टनुसार, लॉक्ड इन सिंड्रोमने त्रस्त असलेल्या लोकांना याचा फायदा होणार आहे. या अवस्थेमध्ये रुग्ण जिवंत असतो पण त्याचं शरीर हालचाल करू शकत नाही. आजारपणामुळे बोलता किंवा हालचाल करू न शकणाऱ्या रुग्णांसाठी हे मशीन उपयुक्त असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. हे मशीन बनवण्याची कल्पना एक्झिट इंटरनॅशनलचे संचालक आणि डॉक्टर फिलिप निट्स्के यांनी दिली आहे, डॉक्टर फिलिप हे 'डॉक्टर डेथ' य़ा नावाने अत्यंत लोकप्रिय आहेत.
स्वित्झर्लंडमध्ये मदत घेऊन मृत्यू पत्करणे कायदेशीर मानले जाते आणि गेल्या वर्षी 1300 लोकांनी इच्छा मृत्यूसाठी या सेवेचा वापर केला. मात्र, या मशीनवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. लोकं डॉक्टर डेथवरही टीका करत आहेत. ते गॅस चेंबरसारखे आहे असं म्हटलं आहे. हे यंत्र आत्महत्येला प्रोत्साहन देते, असेही काहींचे म्हणणे आहे. सध्या फक्त दोन Sarco प्रोटोटाइप अस्तित्वात आहेत. मात्र तिसरे मशीन 3D प्रिंट करत असून ते पुढच्या वर्षी स्वित्झर्लंडमध्ये तयार होईल अशी अपेक्षा आहे.
ऑक्सिजनची पातळी 21 टक्क्यांवरून 1 पर्यंत होते कमी
इच्छा मरण देणारे हे मशीन शवपेटीच्या आकाराचे असून यामध्ये ऑक्सिजनची पातळी ही हळूहळू कमी करून हायपोक्सिया आणि हायपोकॅप्नियाद्वारे मृत्यू देते. या प्रक्रियेत नायट्रोजनचे प्रमाण अवघ्या 30 सेकंदात अनेक पटींनी वाढते, त्यामुळे ऑक्सिजनची पातळी 21 टक्क्यांवरून 1 पर्यंत कमी होते आणि काही सेकंदातच माणसाचा मृत्यू होतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.