सिडनी : ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील एका शॉपिंग मॉलमध्ये गोळीबार आणि चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेस्टफील्ड बाँड जंक्शनच्या शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार आणि चाकूहल्ला झाला. या घटनेनंतर शॉपिंग मॉल रिकामा करण्यात येत आहे. पोलिस बचावकार्य करत आहेत. पोलिसांनी हल्लेखोराला ठार केल्याचे वृत्त आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
ऑस्ट्रेलियन न्यूज वेबसाइट news.com.au नुसार, ही घटना घडली तेव्हा मॉलमध्ये गर्दी होती. जमिनीवर सर्वत्र रक्त पसरले होते, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. तर मिळालेल्या माहितीनुसार, शेकडो लोकांना मॉलमधून बाहेर काढण्यात आले आहे. तसेच, न्यू साउथ वेल्स पोलिसांनी लोकांना या भागापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
या वेबसाइटच्या वृत्तानुसार, एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, जॉनी सँटोस आणि केविन त्जो वूलवर्थ्समध्ये खरेदी करत असताना एक व्यक्ती एस्केलेटरवरून खाली आला आणि त्याने ओरडून सांगितले की, एक व्यक्ती लोकांना चाकू मारत आहे. तेवढ्यात हिरवा शर्ट घातलेला एक माणूस खाली पळताना दिसला. तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून येत होते. काही जणांनी त्याच्यावर निशाणा साधून बोलार्ड फेकले. दरम्यान, तो स्केलेटरवरून मागे पळून गेला.
दरम्यान,पोलिसांनी अधिक तपास करत हा दहशतवादी हल्ला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला. या हल्ल्यानंतर मॉलमध्ये एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सद्यस्थितीत पोलिसांनी संपूर्ण मॉल परिसरातील सुरक्षेत वाढ केली आहे. तसेच, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून काही फोटोही समोर येत आहेत.