अबू धाबी - यूएईची राजधानी अबू धाबी इथं भव्यदिव्य पहिले हिंदू मंदिर उभं राहिले आहे. जवळपास ७०० कोटीहून अधिक खर्च या मंदिराच्या बांधकामासाठी झाला आहे. आता हे मंदिर पूर्ण झालं असून येत्या १४ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी जबाबदारी BAPS स्वामीनारायण संस्थेकडे होती. या संस्थेने मंदिराच्या लोर्कापणासाठी यूएईमधल्या अनेक नेत्यांना निमंत्रण पाठवली आहेत.
BAPS चे आंतरराष्ट्रीय विभागाचे प्रमुख स्वामी ब्रह्मबिहारीदास यांनी सांगितले की, सद्भाव आणि सहिष्णुता यांचे हे मंदिर प्रतिक असेल. मंदिराच्या निर्मितीसाठी यूएईच्या नेत्यांनी परवानगी दिली त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. हे मंदिर हिंदूंसाठी धार्मिक स्थळ असेल. परंतु BPAS हिंदू मंदिराचा मूळ हेतू या धरतीवर सद्भावना वाढवण्यावर असेल. मंदिर शांततेला प्रोत्साहन देईल आणि भारत-यूएई यांच्यातील घनिष्ट संबंधाचे प्रतिक होईल असं त्यांनी म्हटलं.
तसेच यूएईचे संस्थापक दिवंगत शेख जायद बिन सुल्तान अल नाहयान यांच्यापासून राष्ट्रपती शेख मोहम्मद यांच्याकडून मंदिराला योगदान मिळाले. त्याबद्दल संस्थेने कौतुक केले. राष्ट्रपती क्राऊन प्रिन्सने मंदिरासाठी जमीन दिली होती. यूएईचे राष्ट्रपती मोठ्या मनाचा दिलदार नेता आहे. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत आम्ही २०१८ मध्ये दोन योजना दाखवल्या. एक पारंपारिक सामान्य इमारत होती. तर दुसरे दगडापासून बनलेले होते. तेव्हा जर तुम्ही मंदिर बनवत असाल तर ते मंदिरासारखेच दिसले पाहिजे असं पंतप्रधानांनी म्हटलं.
काय आहे वैशिष्टे?हे मंदिर यूएईच्या ५.४ हेक्टर जागेवर बनवण्यात आले आहे. त्यात सामुहिक हॉल, पार्किंगचाही समावेश करून ११ हेक्टरपर्यंत वाढवण्यात आले. भारतातील कुशल कारागिरांनी दगड आणि संगमरवर यांच्या नक्षीकामाचा साचा पाठवला. त्यानंतर तो यूएई येथे जोडण्यात आला. प्राचीन मंदिरातील रचनेला ध्यानात ठेऊन त्यात कुठेही लोखंड आणि स्टीलचा वापर करण्यात आला नाही. मंदिराच्या लोकार्पणाला आता केवळ २ आठवडे बाकी आहेत. त्यामुळे मुख्य मंदिरापासून क्रेन आणि महाकाय मशिन हटवण्यात आल्या आहेत.