पर्ल हार्बर- अमेरिकेच्या लष्कराने पॅसिफिक कमांडचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय आज घेतला आहे. आता या कमांडचे नाव इंडो-पॅसिफिक कमांड असे करण्यात आले आहे. भारताचे दक्षिण आशियातील वाढते महत्त्व लक्षात घेता हा निर्णय़ घेण्यात आला असे पेंटॅगॉनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पॅसिफिक कमांड हा विभाग पॅसिफिक महासागराच्या प्रदेशातील सर्व हालचालीं आणि कारवायांची जबाबदारी पाहातो. सुमारे 3 लाख 75 हजार नागरिक आणि सैनिकांची नेमणूक त्यासाठी करण्यात आलेली आहे. या प्रदेशात भारताचाही समावेश होतो.पॅसिफिक समुद्र आणि हिंदी महासागरातील मित्रदेशांशी आमचे संबंध याप्रदेशातील प्रादेशिक स्थैर्य टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत असे अमेरिकेचे संरक्षण सचिव जीम मॅटिस यांनी सांगितले. याप्रदेशात वृद्धिंगत झालेल्या संबंधांमुळेच आम्ही पॅसिफिक कमांडचे नाव इंडो-पॅसिफिक कमांड असे करत आहोत असेही मॅटिस म्हणाले. चेंज ऑफ कमांड या सोहळ्यात ते बोलत होते. या कमांडची जबाबदारी अॅडमिरल हॅरी हॅरिस यांच्याकडून फिलिप डेव्हीडसन यांनी स्वीकारली. हॅरी हॅरीस यांची डोनल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कोरियात अमेरिकेचे राजदूत म्हणून केली आहे. या नामांतरामुळे या प्रदेशासाठी काही विशेष फायदा होणार नसला तरी भारताचे या प्रदेशातील वाढते महत्त्व अधोरेखित होणार आहे. भारताला संरक्षण साधने, शस्त्रे विकण्यासाठी अमेरिका नेहमीच प्रयत्नशील असते. गेल्या दशकभरात अमेरिका भारताला शस्त्रास्त्रे विकण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असून अमेरिकेने 15 अब्ज डॉलर्स किमतीची शस्त्रे या काळात भारताला विकली आहेत.
अमेरिकेने बदलले पॅसिफिक कमांडचे नाव, भारताचे महत्त्व अधोरेखित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 11:54 AM