Bashar al Assad syria civil war News: सीरियात गृहयुद्धाचा भडका उडाला असून, हयात तहरीर अल शाम या कट्टरपंथीय संघटनेच्या बंडखोरांनी आधी होम्स आणि आता सीरियाची राजधानी दमास्कसवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. दरम्यान, बंडखोर दमास्कमध्ये दाखल होण्याआधीच सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद देशातून पळून गेले आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दोन वरिष्ठ सीरियाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
हयात तहरीर अल शाम या इस्लामी कट्टरपंथी बंडखोरांच्या गटाने सरकारविरोधात बंड केले असून, सीरियातील परिस्थिती चिघळली आहे. बंडखोरांनी दमास्कसकडे कूच केल्यानंतर होम्स आणि आजूबाजूची काही ठिकाणे ताब्यात घेतली.
राष्ट्राध्यक्ष असद फरार
बंडखोरानी दमास्कसच्या दिशेने कूच केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बशर अल असद फरार देशातून झाले. सुरूवातीला ह्यात तहरीर अल शामने टेलिग्राम चॅनेलच्या माध्यमातून हा दावा केला होता. एका काळा अध्याय संपला. आता नवीन सुरूवात होत आहे, असे बंडखोराच्या गटाने असद फरार झाल्याचा दावा करताना म्हटले.
दरम्यान, रॉयटर्स वृत्तसंस्थेने सीरियाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, बशर अल असद सीरियातून दुसऱ्या देशात पळून गेले आहे. असद कोणत्या देशात गेले आहेत, हे माहिती नाही, असेही या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
सीरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राइट्सनेही असे म्हटले आहे की, दमास्कस विमानतळावरून एक खासगी विमान निघाले आहे. ज्यामध्ये राष्ट्राध्यक्ष बशर अल असद असू शकतात. रडारचे फोटोही समोर येत आहेत, ज्यात दावा केला जात आहे की, एक विमान दमास्कसच्या विमानतळावरून निघाले, मात्र नंतर ते रडारवरून गायब झाले.
या शहरांवर बंडखोरांनी मिळवला ताबा
हयात तहरीर अल शामच्या बंडखोरांनी हमा, अलेप्पो आणि दरा या शहरांवर ताबा मिळवला. त्यानंतर होम्स हे शहर ताब्यात घेतल्यानंतर बंडखोर दमास्कसच्या दिशेने निघाले. सीरियात गृहयुद्ध उफळल्यानंतरचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत.