Russia Vladimir Putin : “युक्रेनमध्ये पाश्चात्य देशांकडून सीरिया-इराकसारखा खेळ,” पुतीन यांचा बायडेन यांच्यावर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 03:57 PM2023-02-21T15:57:04+5:302023-02-21T15:57:46+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन सोमवारी अचानक युक्रेनची राजधानी कीव्ह येथे पोहोचले. त्यांच्या अचानक दिलेल्या भेटीनंतर सर्वांनाच धक्का बसला.
युक्रेनच्या युद्धाला येत्या २४ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण होणार असून, त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला सोमवारी अचानक भेट दिली व सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. युक्रेनच्या पाठीशी अमेरिका भक्कमपणे उभी आहे, हे बायडेन यांनी आपल्या युक्रेन दौऱ्यातून रशियाला दाखवून दिले. बायडेन यांच्या भेटीबद्दल विलक्षण गुप्तता पाळण्यात आली होती. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियाच्या लोकांना संबोधित केलं. यावेळी युक्रेनमध्ये पाश्चात्य देशांकडून सीरिया-इराकसारखा खेळ खेळल्याचा आरोप करण्यात आला.
“डोनबासच्या सुरक्षेसाठी रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू केली. युक्रेनमध्ये सतत हल्ले होत असतानाही डॉनबासचे लोक ठाम होते. रशियानं शांततापूर्ण मार्गाने डॉनबासच्या समस्या सोडविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. डॉनबासच्या लोकांनी विश्वास ठेवला, त्यांना आशा आहे की रशिया त्यांच्या बचावासाठी येईल. पण पाश्चात्य देशांनी पुन्हा तोच खेळ केला,” असं पुतीन आपल्या संबोधनादरम्यान म्हणाले.
विशेष मोहीम सुरू होण्यापूर्वीच, पाश्चात्य देश युक्रेनला हवाई संरक्षण पुरवण्यासाठी चर्चा करत होते. रशियाने वर्षानुवर्षे पाश्चात्य देशांशी संवादाची तयारी दाखवली आहे, मात्र नेहमीच दुर्लक्ष केलं गेल्याचंही पुतीन यांनी स्पष्ट केलं.
सोमवारी भोंग्यांचा आवाज
सोमवारी युक्रेनच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजता कीव्ह शहरातील भोंगे अचानक अधिक जोरात वाजू लागले. हवाई हल्ला होण्याची शक्यता असेल तर अशा पद्धतीचे भोंगे वाजविले जातात, हे आता तेथील नागरिकांच्या सवयीचे झाले आहे; पण सोमवारी कीव्हमधील सर्व प्रमुख रस्ते नागरिकांसाठी बंद करण्यात आले होते.
युक्रेनला मदत
रशियाने एक वर्षापूर्वी आक्रमण केल्यानंतर काही काळ धास्तावलेले कीव्ह आता पुन्हा खंबीरपणे उभे ठाकले आहे. युक्रेन व तेथील लोकशाही ताठ मानेने उभी आहे व आपल्यावर आक्रमण करणाऱ्यांचा समर्थपणे मुकाबला करत आहे. अमेरिका ही नेहमीच युक्रेनच्या बाजूने उभी राहील. युक्रेनला ५० कोटी डॉलरची अतिरिक्त मदत देण्यात येईल, असं बायडेन म्हणाले.