Syria conflict: सीरियातील बशर अल असाद यांचे सरकार हयात तहरीर अल शाम संघटनेने उलथवून लावल्याने गोंधळ माजला आहे. अचानक झालेल्या या उलथापालथीमुळे अनेक परदेशी नागरिक सीरियात अडकले. यात भारतीयांचाही समावेश असून, ७५ भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने याबद्दलची माहिती दिली आहे.
भारताने मंगळवारी (१० डिसेंबर) सीरियात अडकलेल्या ७५ नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. हयात तहरीर अल शामच्या बंडखोरांनी बशर अल असाद यांच्या सरकार हटवल्याच्या दोन दिवसांनी ही गोष्ट घडली.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दलचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यांना देशातून बाहेर काढण्याचे काम दमास्कस आणि बैरूतमधील भारतीय उच्चायुक्तालयातून करण्यात आले.
सीरियातून बाहरे काढण्यात आलेल्या लोकांमध्ये जम्मू काश्मीरमधील ४४ लोक आहेत. हे सैय्यदा जैनब (सीरियातील शिया मुस्लिमांचे एक धार्मिक स्थळ) येथे अडकले होते. या नागरिकांना सीरियातून बाहेर काढल्यानंतर लेबनानमध्ये नेण्यात आले. त्यानंतर आता ते विमानाने भारतात परतणार आहेत.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे की, राजधानी दमास्कस आणि बैरूतमधील भारतीय दूतावासांमध्ये चांगला समन्वय आहे. त्यामुळे भारतीयांना सुरक्षित सीरियातून बाहेर काढणे शक्य झाले. सीरियातील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि तिथे असलेल्या नागरिकांच्या संपर्कात आहोत.