अम्मान : सिरियातील अलेप्पो शहरात बंडखोर व सैनिक यांच्यात युद्ध चालूच असून, अलेप्पो येथील लष्करी तळावर झालेल्या बॉम्बस्फोटात ४० सैनिक मारले गेले. दरम्यान, सरकारनेही आपले हवाई हल्ले अधिक तीव्र केले असून, गेल्या तीन दिवसांत १३२ नागरिक मरण पावले आहेत. लष्करी तळावर झालेल्या बॉम्बस्फोटाची चित्रफीत इंटरनेटवर प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यात स्फोटाने प्रचंड हानी झालेली दिसत आहे. इस्लामिक फ्रंट या बंडखोरांच्या संघटनेने या स्फोटाची जबाबदारी घेतली आहे.(वृत्तसंस्था) या स्फोटात ४० सैनिक मरण पावले, असा त्यांचा दावा आहे, तर ब्रिटनमधील सिरिया मानवी हक्क संघटनेने २० सैनिक मारले गेले, असे म्हटले आहे. बंडखोर अध्यक्ष बशर अल असद यांना पदच्युत करण्यासाठी लढत आहेत. ते नेहमी गनिमी हल्ले करतात; पण अलीकडेच ते स्फोटके भरलेले टनेल बॉम्ब वापरत आहेत. गोळीबार, हवाई हल्ले, कारबॉम्बचे स्फोट, तोफगोळ्यांचा मारा व फासावर चढविणे अशा विविध मार्गांनी मृत्यू सिरियात थैमान घालत असून, दररोज २०० लोक बळी जातात. शांततापूर्ण मार्गाने सुरू झालेल्या आंदोलनाने हिंसाचाराचा मार्ग हाती घेतला असून, आतापर्यंत १ लाख ५० हजार लोकांचा मृत्यू व लाखो लोक बेघर झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिंसाचार चालू असून, देशाचा पूर्व व उत्तर भाग बंडखोरांच्या ताब्यात गेला आहे, तरीही सिरियात येत्या मंगळवारी अध्यक्षीय निवडणूक होत असून, असद यांनाच पुन्हा तिसर्या वेळी निवडून आणले जाईल. विरोधक ही निवडणूक म्हणजे फार्स म्हणत आहेत.
सिरियात स्फोट; ४० सैनिक ठार
By admin | Published: June 02, 2014 6:10 AM