तुर्कीमध्ये हाहाकार पाहायला मिळत आहे. भूकंपामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेल्टर होममधील एका खोलीत 25 जणांचे मृतदेह ठेवण्यात आले होते आणि या खोलीत एकच जिवंत व्यक्ती उपस्थित होता. तो रडत रडत मृतदेहांना मिठी मारत होता. कवटाळून त्या मृत्यू झालेल्या लोकांच्या नावाने हाका मारत होता. सीरियाच्या सराकिब शहरात ही घटना घडली आहे. या व्यक्तीचं संपूर्ण कुटुंब भूकंपामुळे उद्ध्वस्त झालं आहे.
तुर्कीपासून सीरियापर्यंत सर्वत्र विध्वंसाचे दृश्य पाहायला मिळत आहे. भूकंपात जमीनदोस्त झालेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. हजारो कुटुंब बेघर झाली. शेकडो मुले अनाथ झाली. या विनाशकारी भूकंपात काहींनी आपला जीवनसाथी गमावला तर काहींनी आपले संपूर्ण कुटुंब गमावले. अशीच एक घटना सीरियात राहणाऱ्या अहमद इदरीससोबत घडली आहे. भूकंपात इदरीसने कुटुंबातील 25 सदस्य गमावले. कुटुंबातील 25 जणांचा मृत्यू झाला होता.
"सीरियात सुरू असलेल्या युद्धामुळे तो सराकिबपर्यंत पोहोचला. जेणेकरून मुलांना आणि स्वतःला सुरक्षित निवारा मिळू शकेल. पण बघा आमच्यावर काय वेळ आली, किती अन्याय झाला" असं इदरीसने म्हटलं आहे. या भूकंपात त्यांच्या कुटुंबातील बहुतांश सदस्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. माझ्यासोबत असे होईल असे मला कधीच वाटले नव्हते. मी माझी मुलगी, तिचे दोन मुलगे गमावले असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"माझी आई कुठेय?", भूकंपातून वाचलेल्या चिमुकलीचा प्रश्न ऐकून जवानही भावूक
विनाशकारी भूकंपामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. हजारो लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. लोक त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. जे वाचले आहेत ते पूर्णपणे हतबल आहेत. घटनास्थळावरून अनेक हृदयद्रावक दृश्ये समोर येत आहेत. एक चिमुकली वाचल्यानंतर आपल्या आईचा शोध घेत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, जेव्हा मुलीला ढिगाऱ्यातून बाहेर काढले जाते तेव्हा ती तिच्या आईबाबत प्रश्न विचारू लागते. एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, विनाशकारी भूकंपानंतर ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढल्यानंतर एक मुलगी सुरक्षा कर्मचार्यांना विचारते, "माझी आई कुठे आहे." हे ऐकून तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हेट शहरातील आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"