तुर्कस्तानहून इटलीला जात असलेल्या एका प्रवासी बोटीवरील अन्नपाणी, पेट्रोल संपल्याने 32 प्रवाशांचा सध्या मृत्यूशी संघर्ष सुरू झाला. बोटीतील प्रवाशांच्या सुटकेआधी सहा जणांचा प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये तीन महिला आणि तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह कुजू लागल्याने बोटीवरील इतर प्रवाशांनी ते समुद्रात फेकल्याची घटना समोर आली आहे. याचा एक व्हि़डीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
एक वडील त्यांच्या मुलाचा मृतदेह समुद्रात फेकताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून त्यावेळच्या भयंकर परिस्थितीची कल्पना येऊ शकेल. मुलाला फेकणारी व्यक्ती मूळची सीरियाची रहिवासी आहे. सीरियातील परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यामुळे ते अवैधपणे इटलीला जात होते. वडील त्यांच्या मृत मुलाला समुद्रात फेकत असताना बोटीवरील सर्व जण अल्लाहू अकबर म्हणत होते.
27 ऑगस्टला 32 प्रवाशांनी भरलेली बोट तुर्कस्तानच्या अंताल्या शहरातून इटलीच्या पोजालो येथे जाण्यासाठी निघाली. प्रवासाचं अंतर मोठं होतं. मात्र बोटीवर फारसं सामान नव्हतं. हळूहळू अन्नपाणी, पेट्रोल संपू लागलं. सगळं संपताच महिला आणि मुलांची प्रकृती बिघडू लागली. कोणालाच काही कळेना. जिवंत राहण्यासाठी समुद्राचं पाणी टूथपेस्टमध्ये मिसळून त्यांनी आपली भूक शमवली.
अन्नपाण्याअभावी सहा जणांची प्रकृती बिघडली. तीन महिला आणि तीन लहान मुलांना ताप आला. खायला काहीच नसल्याने अशक्तपणा वाढला आणि त्यांनी जीव सोडला. बोटीतील प्रवाशांनी त्यांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले. समुद्र किनारा गाठल्यानंतर त्यांच्यावर नीट अंत्यसंस्कार करू, असं प्रवाशांना वाटत होतं. मात्र प्रवास खूप लांबचा असल्यानं समुद्र किनारा येण्याआधीचे सहा जणांचे मृतदेह कुजू लागले. मृतदेह खराब होऊ लागल्याने बोटीतील त्यांच्या कुटुंबीयांनी ते समुद्रात फेकण्याचा निर्णय घेतला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.