वॉशिंग्टन : मुंबईवर २००८मध्ये झालेल्या लष्कर-ए-तय्यबाने केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असलेला तहव्वूर राणा याचे भारतात प्रत्यार्पण केले जाऊ शकते, असा निकाल अमेरिकेच्या न्यायालयाने दिला आहे. या निकालामुळे राणाला माेठा झटका बसला आहे. तो मूळ पाकस्तानी नागरिक असून, व्यवसायानिमित्त अमेरिकेत स्थायिक झाला आहे.
न्यायालयाने म्हटले आहे की, प्रत्यार्पणबाबत भारत व अमेरिकेमध्ये एक करार झाला आहे. त्याच्याद्वारे राणा याला भारताच्या स्वाधीन करता येऊ शकते. राणावर हल्ल्याशी संबंधित आराेपांबाबत भारताने भक्कम पुरावे दिले आहेत. राणा याचा हेबिअस काॅर्पस अर्ज सेंट्रल डिस्ट्रिक्ट ऑफ कॅलिफोर्नियाच्या डिस्ट्रिक्ट कोर्टाने फेटाळून लावला होता. तो निर्णय योग्य असल्याचे यूएस कोर्ट ऑफ अपिल्सने म्हटले आहे.
राणाने दिले प्रत्यार्पण प्रक्रियेला आव्हानतहव्वूर राणा याचे भारतामध्ये प्रत्यार्पण करावे, अशी मागणी केंद्र सरकारने अमेरिकेकडे केली होती. त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली असता राणाने त्याला आव्हान दिले. त्यावरून आता न्यायालयीन लढाई अमेरिकेत सुरू आहे.
डेव्हिड हेडलीच्या संपर्कात हाेता राणाराणा सध्या लॉस एंजलिसच्या कारागृहात आहे. ताे राणा हा मुंबई हल्ला कटातील एक महत्त्वाचा सूत्रधार व दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीच्या संपर्कात होता. ते दाेघेही जवळचे मित्र हाेते. यूएस कोर्ट ऑफ अपिल्सने दिलेल्या निकालाविरोधात राणा अपील करू शकतो. न्यायालयाने म्हटले आहे की, भारत-अमेरिकेने केलेल्या प्रत्यार्पण करारामध्ये ज्या गुन्ह्यांचा उल्लेख केला आहे त्यात दहशतवादी कारवायांचाही समावेश करण्यात आलेला आहे.