बीजिंग: चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनानं अनेक देशांचं कंबरडं मोडलं. कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोकांचा बळी गेला आहे. जगातील जवळपास सर्वच देशांना कोरोनाची झळ सोसावी लागत आहे. चीनच्या वुहानमधून जगभरात कोरोना पोहोचला. २०१९ मध्ये वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. आता २०२१ चा मध्य आल्यानंतरही जग कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडलेलं नाही. चीनमुळे जग एका प्रचंड संकटातून जात असताना आता चीननं आणखी एक पराक्रम करून ठेवला आहे.
हाँगकाँगच्या जवळ चीनचा एक अणूप्रकल्प आहे. काही दिवसांपूर्वीच या प्रकल्पातून गळती झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. चीननं ही बातमी पुढे येऊ नये यासाठी बरेच प्रयत्न केले. या प्रकल्पातून होणारी गळती वाढल्यास बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. हाँगकाँगच्या जवळ असलेल्या अणू प्रकल्पात फ्रान्सच्या एका कंपनीची भागिदारी आहे. त्यामुळे आता अमेरिका आणि फ्रान्सनं चौकशी सुरू केली आहे.बापरे! चीनच्या वुहान लॅबमध्ये पिंजऱ्यात कैद आहेत जिवंत वटवाघूळ ; Video व्हायरल
चीनच्या गुआंगदोंस प्रांतात असलेल्या ताइशन अणू प्रकल्पातून (Taishan Nuclear Power Plant)किरणोत्सारी पदार्थांची गळती झाली. या गळतीचं प्रमाण तपासण्याचं काम सध्या अमेरिकेतील बायडन प्रशासन करत आहे. किरणोत्सारी पदार्थांची जास्त प्रमाणात गळती झाल्यास त्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे केवळ लोकांनाच नव्हे, तर पर्यावरणालादेखील फटका बसू शकतो. किरणोत्सारी पदार्थांमुळे हवा विषारी होचे. त्यामुळे आसपास असलेल्या देशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
किरणोत्सारी पदार्थांच्या संपर्कात आल्यास मृत्यू होण्याचा धोका संभवतो. यामुळे तंदुरुस्त व्यक्तीदेखील काही दिवसांत मृत्यूमुखी पडू शकते. किरणोत्सारी पदार्थ शरीरातील रक्ताच्या संपर्कात येतात. त्वचा, हाडांवर किरणोत्सारी पदार्थांचे घातक परिणाम होतात. यामुळे रक्ताचा कर्करोगदेखील होण्याची भीती असते. किरणोत्सारी पदार्थ केवळ कोशिकांवरच हल्ला करत नाही, तर ते शरीराच्या विविध अवयवांवर प्रतिकूल परिणाम करतात. यामुळे थायरॉईड कर्करोग होतो. लहान मुलांना याचा जास्त धोका असतो.