काही महिन्यांपूर्वी मालदीवच्या संसदेत हाणामारी झाल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. अशीच घटना आता तैवानमध्ये घडली आहे. भारतीय संसदेतही धक्काबुक्की झाली होती. रस्त्यावरची हाणामारी आता पवित्र मंदिर मानल्या जाणाऱ्या संसदेतही गेल्याच्या घटना आता सामान्य होऊ लागल्या आहेत.
तैवानच्या संसदेत शुक्रवारी खासदारांमध्ये जोरदार राडा झाला. वाद एवढा वाढला की प्रकरण पार लाथा बुक्क्यांनी एकमेकांना मारण्यापर्यंत गेले. काही कायद्यांमध्ये बदल करण्यावरून बाचाबाची सुरु झाली होती. खासदारांना सरकारच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी जास्तीचे अधिकार देण्याविषयी चर्चा होणार होती. सोशल मीडियावर याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये काही खासदार फाईल हिसकावून पळतानाही दिसत आहेत.
अन्य व्हिडीओमध्ये खासदारांनी अध्यक्षांना घेरल्याचेही दिसत आहे. काही जण टेबलांवरून एकमेकाना मारण्यासाठी उड्या मारत आहेत. आपल्या सहकाऱ्यांना जमिनीवर पाडत, ओढताना दिसत आहेत. तैवानमध्ये नवनिर्वाचित सरकार आले आहे. लाई चिंग-ते हे येत्या सोमवारी शपथ घेणार आहेत. त्यापूर्वीच ही हाणामारी झाली आहे.
लाई यांच्या डीपीपी पक्षाने जानेवारीत निवडणुका जिंकल्या परंतु संसदेत बहुमत गमावले आहे. विरोधी पक्ष केएमटीकडे डीपीपी पेक्षा जास्त जागा आहेत. परंतु त्या देखील बहुमत सिद्ध करण्यास पुरेशा नाहीत. ते टीपीपी सोबत आघाडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडे ११३ पैकी ८ जागा आहेत. परंतु अद्याप त्यास यश आलेले नाही.