तैपेई : लष्करप्रमुखांसह 12 जणांना घेऊन जाणाऱ्या तैवानच्या हेलिकॉप्टरला आज आपत्कालीन लँडिंग करावे लागले. मात्र, यावेळी हेलिकॉप्टरला अपघात झाला आणि ते जंगलामध्ये कोसळले. या अपघातात लष्करप्रमुखांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
जनरल शेन यी मिंग आणि 12 अधिकारी लष्कराच्या ब्लॅक हॉक या हेलिकॉप्टरमधून तैवानच्या इशान्येकडे जात होते. यावेळी हवामान बिघाडामुळे हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. मात्र, यावेळी नियंत्रण कक्षाशी हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला आणि हेलिकॉप्टर राजधानी तैपेईच्या जवळच असलेल्या जंगलामध्ये कोसळले.
यानंतर लगेचच लष्काराने शोधमोहिम हाती घेतली. या हेलिकॉप्टरमध्ये हवाई दलाचे प्रमुखही असल्याचे सांगितले जात होते. तसेच लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही होते. त्यांच्या शोधासाठी दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर आणि 80 सैनिक पाठविण्यात आले होते. आज सकाळी हा अपघात झाला. अखेर हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले असून यातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
तैवानमध्ये येत्या 11 जानेवारीला अध्यक्षीय निवडणूक होऊ घातली आहे. या अपघाताची माहिती मिळताच आज शोक दिवस म्हणून प्रचार थांबविण्यात आला आहे. तैवानने चीनमधील नागरी य़ुद्धानंतर 1949 मध्ये स्वातंत्र्य मिळविले होते. मात्र, चीन आजही तैवान हा देश आपलाच भाग असल्याचा दावा करत आला आहे.