Taiwan News: चीनकडून सातत्याने मिळणाऱ्या लष्करी कारवाईच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर तैवानने पाच दिवसांच्या लष्करी कवायती(मिल्ट्री ड्रील) सुरू केल्या आहेत. सोमवारी उत्तर तैपेईच्या रस्त्यावरुन सर्व गाड्या बाजूला करणे आणि लोकांना घरात राहण्याचे आदेश देण्यात आले. वार्षिक लष्करी कवायतीसाठी स्थानिक वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सायरन वाजले, त्यानंतर संपूर्ण शहरात शांतता पसरली.
या कवायतीसाठी राजधानी तैपेईसह सर्व शहरे 30 मिनिटांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आली होती. न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या वृत्तानुसार, यानंतर सर्वांना हवाई हल्ल्याचाही इशारा देण्यात आला. तैवानचे राष्ट्रपती त्साई इंग-वेन यांनी 'वॅन एन' नावाच्या मॉक एअर ड्रीलच्या एक तास आधी फेसबुकवर देशातील जनतेला संबोधित केलेल्या पोस्टमध्ये म्हटेले की, "तुम्हाला संदेश प्राप्त होईल, त्यात 'टेस्ट' आणि 'ड्रिल' सारखे शब्द असतील. हा संदेश वाचा आणि जिथे आहात तिथे शांत रहा."
मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर सर्व दुकाने, मॉल, बाजारपेठ बंद करण्यात आली होती. रस्त्यावरील सर्व गाड्याही बाजुला करण्यात आल्या होत्या. सायरन वाजवून लोकांनाही घरात बसण्यास सांगितले होते. या मॉक ड्रीलबद्दल अनभिज्ञ असलेले तैपेईला आलेले पर्यटकही आश्चर्यचकित दिसले. अचानक सायरन वाजल्यामुळे ते घाबरले. तैपेईमधील अधिकाऱ्यांनी नागरिकांना तात्काळ घर किंवा पार्किंगच्या ठिकाणी जाण्यास सांगितले. यानंतर सर्व मॉक ड्रील झाले.