Taiwan warning China: चीनने तैवानच्या सागरी सीमा आणि हवाई क्षेत्राजवळ आपला दोन दिवसीय सराव सुरू केला आहे. तैवानने आपल्या सीमावर्ती भागाजवळ चीनने युद्धाभ्यास केल्याबद्दल चीनला तीव्र विरोध दर्शवला आहे. तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, चीनने स्वतःवर नियंत्रण ठेवावे आणि तैवानच्या सीमेत बदल करण्याचा प्रयत्न करू नये. याशिवाय, तैवान चीनच्या दबावाखाली येणार नाही. त्यामुळे तैवान सामुद्रधुनीतील स्थिती बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न करू नये, असेही निवेदनात खडसावण्यात आले आहे.
चीनकडून तैवानवर वचक बसवण्याचा प्रयत्न
चीनने आपल्या लष्करी सरावाबद्दल म्हटले आहे की, हा युद्धाभ्यास सराव तैवानच्या स्वातंत्र्य दलाच्या फुटीरतावादी कारवायांसाठी कठोर शिक्षा आणि परकीय शक्तींचा हस्तक्षेप आणि चिथावणीविरूद्ध कडक इशारा आहे. चीन या सरावाद्वारे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मजबूत संकेत देण्याचा प्रयत्न करत आहे. कारण तैवानचे नवे राष्ट्राध्यक्ष शशी लाई यांनी आपल्या पहिल्याच भाषणात चीनला अनेक इशारे दिले होते.
तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे चीनला उत्तर
तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, तैवान सामुद्रधुनीमध्ये शांतता आणि स्थैर्य राखणे ही आंतरराष्ट्रीय समुदायाची जबाबदारी आहे आणि त्यासाठी सर्वांची सहमती आहे. तैवानच्या सामुद्रधुनीवर चीनने सराव करणे ही बाब आंतरराष्ट्रीय समुदायात नोंदवून घेण्यात आली आहे. चीन वारंवार तैवानच्या लोकशाहीला धमकावत आहे. तैवानमधील सामरिक आणि इंडो-पॅसिफिक शांतता आणि स्थिरता एकतर्फीपणे खराब करण्याचा चीनकडून प्रयत्न होत आहे. तैवान सामुद्रधुनीत शांतता राखण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्यामुळे चीनने मर्यादा पाळाव्यात, असा सज्जड दम तैवानने चीनला दिला. परराष्ट्र मंत्रालयाने पुनरुच्चार केला की तैवान लोकशाहीचे पालन करत राहील. बळजबरी आणि दडपशाहीपुढे झुकणार नाही.
राष्ट्राध्यक्ष लाई यांनी दिला होता चीनला इशारा
तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ यांनी आपल्या भाषणादरम्यान म्हटले होते की, प्रिय देशवासियांनो शांतता राखण्याचा आमचा आदर्श आहे. परंतु परकीय आक्रमणे आली तर आम्ही गोंधळून जाणार नाही. चीनचे सर्व दावे मान्य करून सार्वभौमत्व सोडले तरी चीनचा तैवानवर कब्जा करण्याची हाव संपणार नाही, हे समजून घेतले पाहिजे. चीनला या चिथावणीखोर विधानानंतर राग आल्याने चीनी सैन्याने युद्धाभ्यास केल्याचे सांगितले जात आहे.